
श्रीवर्धन: अरबी समुद्रात तयार होत असलेले निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीच्या भागातून उत्तरेकडे सरकत असताना ते हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथे किनार्यावरती धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता.
श्रीवर्धन: अरबी समुद्रात तयार होत असलेले निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीच्या भागातून उत्तरेकडे सरकत असताना ते हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथे किनार्यावरती धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. वेधशाळेच्या योग्य अंदाजानुसार बारा दिवसांपुर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हरिहरेश्वर, श्रीवर्धन किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत चक्रीवादळ झाले व त्यानंतर बारा ते एक वाजेपर्यंत वादळ पूर्णपणे थांबले होते व काही प्रमाणात उन्हाची तिरीपदेखील पाहायला मिळत होती. त्यामुळे अनेकांना असे वाटले की वादळ पुढे निघून गेले आहे आता परत वादळ होणार नाही. पण मधला जो वेळ होता त्याला चक्रीवादळाचा लुल पिरियड असे म्हणतात. पुन्हा दुपारी एक वाजता पहिल्या वादळापेक्षा दुप्पट वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली. वादळाचे रौद्ररूप काय असते ते श्रीवर्धनवासियांनी अनुभवले. दुपारी एक ते सव्वा तीन या सव्वा दोन तासांच्या काळामध्ये चक्रीवादळाचा स्पीड प्रतितास २५० किलोमीटरपेक्षाही जास्त झाला होता. त्यामुळे शेवटच्या सव्वा दोन तासांमध्ये वादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. श्रीवर्धनमधील घरे उद्ध्वस्त झाली. गुरांचे गोठे पडले व नारळ सुपारीच्या वाड्यादेखील जमीनदोस्त झाल्या.
वादळानंतर तीन दिवस कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे अनेकांचा संपर्कच होऊ शकत नव्हता. परंतु मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना फोन करून चौकशी केली. त्यानंतर अनेक मुंबईकर एक दिवसासाठी आपल्या गावी येऊन जी शक्य होईल ती मदत आपल्या शेजारी, पाजारी किंवा नातेवाईक यांना करताना दिसत आहेत. अनेकांनी किराणा सामान, मेणबत्या त्याचप्रमाणे वीजपुरवठा खंडित असल्यामुळे लागणारी विविध प्रकारची पीठे देखील श्रीवर्धनवासियांना वाटली आहेत. देशापुढे कोरोनाचे संकट असताना श्रीवर्धन तालुक्यात बसलेला वादळाचा तडाखा यामुळे श्रीवर्धन जवळजवळ दहा वर्ष मागे गेले आहे, असे म्हणावे लागेल.