रायगड प्राधिकरणाच्या जल संवर्धन कामात मिळणार नामची मदत; येत्या अडीच महिन्यांत दोन गावांतील कामे करणार पूर्ण : नाना पाटेकर

रायगड येथे स्वराज्याची राजधानी उभारताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावे वसविली आहेत. त्यावेळेस येथे पाण्याचे स्त्रोत होते, म्हणूनच ही गावे वसली आहेत. आपल्याला ते स्त्रोत शोधून हे जलसंवर्धन करायचे असल्याचे ते म्हणाले.

  • अडीच वर्षात प्रधिकरणातील सर्व गावे होणार टंचाईमुक्त

महाड : रायगड विकास प्रधिकरणाला जलसंवर्धन कामासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. प्राधिकरणातील २१ गावांतील जलसंवर्धनाची जबाबदारी नाम ने घेतल्याची घोषणा आज नाना पाटेकर यांनी पाचाड येथे केली. रायगड विकास प्रधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी रायगड प्रधिकरणातील जलसंवर्धन या विषयावर आज पाचाड येथे एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नामचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, महाडच्या सभापती सपना मालुसरे, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह २१ गावांतील लोकप्रितनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळेस बोलताना नाना पाटेकर यांनी, रायगड येथे स्वराज्याची राजधानी उभारताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावे वसविली आहेत. त्यावेळेस येथे पाण्याचे स्त्रोत होते, म्हणूनच ही गावे वसली आहेत. आपल्याला ते स्त्रोत शोधून हे जलसंवर्धन करायचे असल्याचे ते म्हणाले. पावसाळा सुरु होण्यासाठी केवळ दोन अडीच महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व गावांतील कामे पूर्ण करता येणे शक्य नाही. मात्र, प्रधिकरण ज्या दोन गावांची नावे सुचवेल त्या दोन गावात कामाला प्रारंभ करुन, अडीच महिन्यांमध्ये ती पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्यानंतर इतर सर्व गावांमध्ये कामांना प्रारंभ करुन दोन अडीच वर्षात ती पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले.

मकरंद अनासपुरे यांनी, आपल्या मनोगतात, शिवकाळातील पाण्याचे स्त्रोत कसे शोधायचे याचा मार्ग आमचे तज्ज्ञ शोधतील असे सांगत, या भागात केवळ जलसंवर्धनाचेच नव्हे तर वृक्ष लागवडीचेही काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. प्रधिकरणातील एकवीस गावांमध्ये कशापध्दतीने काम करायचं याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदर सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात, काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार भरत गोगावले यांनी, या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नामचे मिळत असलेले सहकार्य अत्यंत मोलाचे असून, या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

माजी आमदार माणिक जगताप यांनी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे रायगड संवर्धनाचे काम मार्गी लागत असल्याचा उल्लेख आवर्जून केला. काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या दहा बारा वर्षात उर्वरित तीन टक्के काम पूर्ण होवू शकलेले नाही, ते त्वरीत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदर संभाजीराजे यांनीही आपल्या मनोगतामध्ये, काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे अशी भूमिका मांडली. रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून या एकवीस गावांचा हेरिटेज व्हिलेज म्हणून विकास करण्यात येणार असल्याचे सांगत, महाड – रायगड या प्रस्तावित महामार्गाचाही हेरिटेज मार्गाप्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रधिकरणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या अन्य कामांचीही त्यांनी यावेळेस माहिती दिली.

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी, प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये समन्वय रहावा यासाठी एक को- ऑर्डिनेशन समिती स्थापन करण्यात येईल, असे सांगितले. या परिसरात हेलीपॅड, रस्ते, एमटीडीसी निवास व्यवस्था या सुविधा प्रधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. रायगडला अधिकाधिक वैभव प्रप्त करुन देण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने काम करण्याची गरजही त्यांनी यावेळस प्रतिपादित केली. जलसंवर्धनाच्या कामात नामचे मिळणारे सहकार्य मोलाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत, पाचाड धर्मशाळेच्या आवारात ही बैठक घेण्यात आली.