वॉकच्या नावावर भटकणाऱ्या २५ जणांवर नागोठणे पोलिसांची कारवाई

नागोठणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशासह राज्यात सुरू असलेला लाॅकडाऊन ३ मेपर्यंत वाढविल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या

नागोठणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशासह राज्यात सुरू असलेला लाॅकडाऊन ३ मेपर्यंत वाढविल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातही त्या – त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेशही लागू केले आहेत. असे असताना नागोठणे परिसरात माॅर्निग व इव्हिनिंग वाॅकच्या नावाखाली फिरणाऱ्या नागोठण्यातील २५ जणांवर नागोठणे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

नागोठण्यातील पूर्वेकडील भाग असलेल्या वासगाव आदिवासी वाडी रस्त्याकडे व येथील वरवठणे गावाजवळून एम.आय.डी.सी. रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सकाळ व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागोठण्यातील नागरिकांची व तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. यापूर्वी कधीही सकाळ व संध्याकाळी फिरायला बाहेर न पडणारे हौसे-नवसेही आता या दोन्ही रस्त्यांवर सकाळ व संध्याकाळी दिसू लागले होते. यामध्ये वासगाव रस्त्यावर सायंकाळी फिरणाऱ्यांमध्ये तरुण व तरुणींची संख्या जास्त होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच वासगाव आदिवासी वाडी व आजूबाजूच्या वाडीवस्तीवरील ज्या लोकांचे पोट हातावर आहे अशांनीही नागोठण्यात येणे बंद केलेले असतांनाच आमच्या आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर या फिरायला येणाऱ्या तरूण-तरूणींचा व नागरिकांचा आम्हाला त्रास कशाला ? याविषयीची लेखी तक्रार या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती.
त्यानुसार नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहका-यांनी गुरुवारी सायंकाळी येथील एम.आय.डी.सी. रस्त्यावर पालत ठेवून संध्याकाळी फिरणाऱ्या नागोठण्यातील २५ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर भा.दं.वि. कलम ६८ प्रमाणे दंडात्मक स्वरूपाची कारवाई करुन नंतर त्यांना सोडून देण्यात आले. यापुढेही जर कोणी या दोन्ही रस्त्यांवर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत नागोठणे पोलीसांकडून देण्यात आले आहेत.