नागोठणे: सगळीकडेच सर्व नागरिक कोरोनाने भयभीत असतानाच काल अचानक संध्याकाळी निसर्गाने नागोठणे परिसरात उग्ररूप धारण करून त्याच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही हेच दाखवुन दिले. नागोठणे शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले.एकीकडे जोराने सुटलेल्या वाऱ्याने संपूर्ण वातावरण धुळीचे झाले होते.त्याच पाठोपाठ तुफान अशा वाऱ्यासह  आलेल्या जोराच्या आवकाळी पावसामुळे  नागोठणे शहर व परिसरातील शेतकऱ्यांची तसेच सर्वसामान्य नागरिकांची दाणादाण उडविली.

बुधवारी सायंकाळी जोराच्या वादळी वाऱ्यासह आलेल्या या आवकाळी पावसामुळे नागोठणे परिसरातील अनेक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांची चांगलीच तारांबळ उडविली.अगोदरच कोरोनाच्या लॉकडाऊनने सर्वांचे धंदे,व्यवसाय तसेच अडकून पडले असतानाच आज अचानक आलेल्या पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडविली.नागोठणे शहर व परिसरात थैमान घातलेल्या या आवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तसेच विद्युत खांब कोसळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या या आवकाळी पावसामुळे परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे काम तसेच भाजीचे मळे असणार्या शेतकरी वर्गांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे काम ठप्प झाले होते. तसेच आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांनी शेतात लावलेले भाजीचे मळे जोराच्या वाऱ्या पावसामुळे आडवे झाले आहेत. हातातोंडाशी आलेले संपूर्ण पीक शेतात आडवे झाल्याने अगोदरच कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे आयत्यावेळी कंबरडे मोडले आहे. 

या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले.मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. काहींच्या घरावरील कौलं,पत्रे तर काही इमारतींच्या गच्चीवरील सेडचे पत्रे उडून काही अंतरावर फेकले गेले.याच काही इमारतींच्या गच्चीवरील उडालेले पत्रे आजूबाजूच्या काही अंतरावर असलेल्या घरांवर पडल्याने काही घरांचे नुकसान झाले आहे.तर काही घरांची छपरे उडाल्याने घरातील समान तसेच जीवनावश्यक वस्तू भिजून नुकसान झाले आहे. गडगडाटासह चमकणाऱ्या विजांमुळे अंगावर शहारे येत होते.सायंकाळी सहा नंतर सुमारे एक ते दीड तासभर तरी कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर या वादळीवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे नागोठणे रेल्वे स्टेशन समोरील महामार्गावर लोखंडी विद्युत खांब कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.यामुळे महामार्गावर काही काळ गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. या मार्गावरील विद्युत खांब व तारा बाजूला करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे नेहमी वाहतूक कोंडी असणार्या मुंबई गोवा महामार्गावर वाहने कमी प्रमाणात चालू असल्याने नागोठणे पोलिसांकडून या मार्गावरील वाहतूक लगचेच पूर्वरत करण्यात आली. 

दरम्यान नागोठणे येथील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड व त्यांचे सर्वच सहकारी कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत चोवीस तासाच्या आत नागोठणे शहर व परिसरातील काही जास्त प्रमाणात अडचणी येत असणारे भाग वगळता इतर भागातील खंडीत वीज पुरवठा अहोरात्र मेहनत घेऊन सुरळीत केल्यामुळे सर्व नागरिकांनी वैभव गायकवाड व त्यांचे सर्वच सहकारी यांचे आभार मानले.

वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे नागोठणे शहर व परिसरातील नागरिकांच्या घरांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्या सुचनेनुसार नागोठणे व परिसरातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने तलाठी व महसूल विभागातील अधिकारी त्यांच्याकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम आज सुरु करण्यात आले.