प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर नंदा म्हात्रे यांचे उपोषण स्थगित

पेण: पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्नाबाबत येथील स्थानिक महिला नंदा म्हात्रे, दिलीप पाटील आणि संदेश ठाकूर यांनी खारेपाट विकास संकल्प ग्रुपच्या माध्यमातून कालपासून आमरण उपोषण सुरू केले

पेण: पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्नाबाबत येथील स्थानिक महिला नंदा म्हात्रे, दिलीप पाटील आणि संदेश ठाकूर यांनी खारेपाट विकास संकल्प ग्रुपच्या माध्यमातून कालपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र आज अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजबिये,तहसीलदार अरुणा जाधव आणि उपोषण कर्त्यांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

याबाबत अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजबिये यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ जुलैपासून खारेपाट विभागातील पाणीपुरवठा योजनेसाठी पूर्णवेळ सक्षम अधिकारी नेमण्यात येणार असून दर १५ दिवसांनी कामाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकदेखील घेण्यात येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे यापुढे या योजनेतील ठेकेदाराने कामचुकारपणा केल्यामुळे त्याच्याकडून प्रतिदिन २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे असे सांगितले.
 
 उपोषणकर्त्या नंदा म्हात्रे यांनी प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन लेखी आश्वासन दिले आहे म्हणून आम्ही हे उपोषण मागे घेत आहोत, मात्र त्यांनी ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत योजना पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर याहून उग्र आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.