कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे कोसळून पडली, तर काहींचे संसार उद्धवस्त

कर्जत - गेले काही दिवस निसर्ग चक्री वादळाच्या चर्चा सुरू होत्या. कोकण किनारपट्टीलगत येणाऱ्या या वादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण

 कर्जत – गेले काही दिवस निसर्ग चक्री वादळाच्या चर्चा सुरू होत्या. कोकण किनारपट्टीलगत येणाऱ्या या वादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही बसला आहे. या चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे कोसळून पडली, तर काहींचे संसार अक्षरशः उध्वस्त झाले आहेत.  

कोकण किनारपट्टीवर धडकणारे निसर्ग हे चक्री वादळाने संबंध रायगड जिल्ह्यावर आपली वक्रदृष्टी फिरवली. त्यामुळे रायगडमधील इतर तालुक्यांसह कर्जत तालुक्यात दुपारी सुमारे दोन वाजल्यापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.  या वादळाचा जोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की काही भागातील घरावरील पत्रे, कौलारु छप्परे उडून गेली. तर आदिवासी भागातील घराच्या भिंती देखील कोसळल्या. 

काही ठिकाणी विजेच्या तारा,विजचे खांब मोडून पडले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वीज महावितरण ने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केला होता. दुपारी कर्जत तालुक्यात सुरू झालेल्या या वादळाने कर्जत शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडणे, छप्पर उडून जाण्यासारखे प्रकार घडले तर नेरळ शहरासह परिसरात घरावरील छप्पर उडून जाऊन संसार उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही घराच्या छप्पर, भिंती कोसळून पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी विद्यूत खांब व तारा तुटल्याने महावितरणचे देखील मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने या वादळाच्या पार्शवभूमीवर नागरिकांना घरी थांबण्याचे आदेश देऊन या नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज झाले होते. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील जनजीवन साफ विस्कळीत झाले आहे.