निसर्ग चक्रीवादळामुळे निसर्गरम्य श्रीवर्धन तालुका झाला उजाड, शासनाच्या मदतीची अपेक्षा

श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाचा हॉटस्पॉट श्रीवर्धन तालुका ठरल्यामुळे सर्वात जास्त नुकसान श्रीवर्धन तालुक्यात झाले आहे. श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील ९०% घरांवरील छपरे उडून गेली आहेत. तर मोठमोठ्या

श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाचा हॉटस्पॉट श्रीवर्धन तालुका ठरल्यामुळे सर्वात जास्त नुकसान श्रीवर्धन तालुक्यात झाले आहे. श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील ९०% घरांवरील छपरे उडून गेली आहेत. तर मोठमोठ्या इमारती व आरसीसी बांधकाम असलेली घरे यांच्यावरती बांधलेल्या पत्राशेड पूर्णपणे उडून गेल्या आहेत. श्रीवर्धन तालुका नारळ-पोफळीच्या वाडीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्या मुळे नारळ सुपारीच्या संपूर्ण वाड्या झोपून गेल्या आहेत. संपूर्णपणे बहरलेल्या वाड्यांमध्ये आता केवळ २० टक्के झाडे शिल्लक आहेत. वादळाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की मोठमोठे वृक्षदेखील बुंध्यातून उन्मळून पडले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी दोनशे ते दोनशे वीस किलोमीटर इतका असावा असा अंदाज स्थानिक जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे निसर्गरम्य श्रीवर्धन तालुका पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.नारळ सुपारीच्या वाड्या तसेच तालुक्यातील आंबा व काजूच्या बागा आणि केळीच्या बागा पुर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.वादळाचा सगळ्यात जास्त प्रभाव हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, आदगाव या किनारपट्टीला बसला आहे. प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले होते. परंतु काही नागरिकांनी नकार देत आपल्या घरीच राहणे पसंत केले, मात्र चक्रीवादळ सुरू झाल्यानंतर घरावरील पत्रे उडु लागले तसे नागरिक भयभीत होऊन शाळा, मंदिरे यामध्ये जमा होऊ लागले. श्रीवर्धन शहरातील जीवना कोळीवाडा, धोंड गल्ली, त्याचप्रमाणे मेटकर्णी हा परिसर डोंगरावरती आहे. या ठिकाणी डोंगरावर झोपड्या किंवा कच्ची घरे पत्राशेड ने बांधलेली आहेत. नगरपरिषद प्रशासनाने वारंवार विनवणी करून देखील या ठिकाणच्या नागरिकांनी आपली घरे खाली केली नाहीत. पर्यायाने वादळानंतर सर्वांची घरावरील छप्पर पडून गेल्याने नागरिकांनी शाळांमध्ये आसरा घेतला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते, जसवली, रानवली, गालसुरे त्याचप्रमाणे धारवली, साखरोणे इत्यादी गावांमधील ९५ टक्के घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.तालुक्यातील ७२ गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. चक्रीवादळाच्या अगोदरच श्रीवर्धनमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली होती. परंतु प्रशासनाच्या समन्वयातील अभावामुळे वादळाच्या दिवशी एनडीआरएफची टीम शासकीय विश्रामगृहात होती. शासकीय विश्रामगृह समुद्रकिनारी असल्याने वादळ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणाहून येणाऱ्या मार्गावरती असंख्य झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला श्रीवर्धन शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम हातामध्ये कटर घेऊन झाडे कापत कापत शहरात यावे लागले. वादळाच्या वेळी एवढी भयावह परिस्थिती होती की, नागरिक आपल्या घरामध्ये बसून होणारे नुकसान उघड्या डोळ्याने पाहत होते. वादळाच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. मात्र साडेदहा वाजल्यानंतर वादळाला जोरदार सुरुवात झाली त्यानंतर दुपारी बारा वाजता वाऱ्याचा वेग मंदावला व वादळदेखील कमी झाल्यासारखे वाटत होते. मात्र पुन्हा दुपारी एक वाजल्यापासून ते सव्वा तीन वाजेपर्यंत सव्वा दोन तासात वादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. फक्त श्रीवर्धन तालुक्याचा विचार केला तर तालुक्यामध्ये अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फक्त एकच गोष्ट चांगली झाली आहे की जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही. वादळाचा सगळ्यात जास्त प्रभाव होऊन श्रीवर्धन तालुका पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेट देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी श्रीवर्धनला भेट न देता फक्त आलिबाग येथे भेट देऊन ते पुन्हा मुंबईला निघून गेले. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना आता गरज आहे ती आर्थिक मदतीची. कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच तीन महिन्यात लॉकडाऊन मुळे घरात असलेल्या नागरिकांना वादळामुळे झालेले नुकसान व घरांच्या दुरुस्त्या यासाठी आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे