चक्रीवादळ हरीहरेश्वरच्या समुद्र किनार्‍यावर धडकणार या अफवेने श्रीवर्धन तालुक्यात घबराट, मात्र प्रशासनाने दिला दिलासा

श्रीवर्धन: अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता. मागील दोन दिवसांपासून समुद्राच्या पाण्यात देखील बदल झाल्याचे दिसून येत होते. राज्याच्या

श्रीवर्धन: अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे  असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता. मागील दोन दिवसांपासून समुद्राच्या पाण्यात देखील बदल झाल्याचे दिसून येत होते. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला होता. मात्र आज सकाळपासून ते दुपारपर्यंत श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती अनेक लहान मच्छीमार होड्या मच्छिमारी करताना पाहायला मिळत होत्या. निसर्ग नावाचे  चक्रीवादळ उत्तर कोकण तसेच गुजरात राज्यातील किनारी भागाला प्रभावित करू शकते, असे वेधशाळेने आपल्या अंदाजात म्हटले आहे. मात्र अरबी समुद्रात तयार होत असलेले चक्रीवादळ हरिहरेश्वर समुद्र किनार्‍यावरच धडकणार, अशा प्रकारची अफवा तालुक्यात पसरली. सर्वसाधारणपणे अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्वच भागांना त्याचा फटका बसतो. मात्र अचूकपणे चक्रीवादळ या गावाच्या समुद्रकिनारी धडकेल, असे अनेकांनी पसरविले. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तरी राज्यााच्या माहिती व प्रसारण विभागाने अशाप्रकारे आगाऊपणा करून अफवा प्रसिद्ध करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे.

हे चक्रीवादळ हरिहरेश्वर ते दमण या भागातून गुजरातकडे सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मच्छीमार बांधव व किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकिनारी व दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हरिहरेश्वर ते दमण या किनारपट्टीच्या भागातून ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकणार आहे. फक्त हरिहरेश्वर येथेच धडकेल असा कोणताही अंदाज वर्तविण्यात आलेला नाही. – सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अलिबाग, रायगड.