निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर एनडीआरएफची टीम श्रीवर्धनमध्ये दाखल

श्रीवर्धन: चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. अरबी समुद्रात

श्रीवर्धन:  चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले असून त्याला निसर्ग असे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या वर्षीदेखील जून महिन्याच्या दहा तारखेला क्यार नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकल्यानंतर गुजरातच्या दिशेने निघून गेले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन तारखेला सकाळी निसर्ग चक्रीवादळ कोकण किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकताना हरिहरेश्वर ते दमण या भागात कोठेही किनारपट्टीमध्ये प्रवेश करू शकते.

 चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन येथे एन.डी.आर.एफ. ची टीम तैनात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांन देखील जी कच्ची घरे आहेत किंवा जी वादळामुळे प्रभावित होऊ शकतात अशा ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

आज दुपारपासून श्रीवर्धन तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली परंतु कोठेही वादळाचा प्रभाव आढळून आला नाही. एन. डी. आर. एफ. ची टीम श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झालेली असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्वरित आपले कार्य सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे महसूल प्रशासनाने ज्या ठिकाणी ढासळण्यासारखी घरे किंवा कच्ची घरे आहेत अशा ठिकाणच्या नागरिकांचा सर्वे करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. परंतु नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, कारण दिवाळीच्या वेळेला दोन चक्रीवादळे कोकण किनारपट्टीवर धडकतील असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला होता. परंतु यापैकी एकही वादळ कोकण किनारपट्टीवर धडकले नाही. किंबहुना त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले होते. श्रीवर्धन पोलीस व श्रीवर्धन नगरपरिषद यांच्याकडून संपूर्ण शहरामध्ये वारंवार वादळाबाबत सतर्क राहण्यासाठी  उद्घोषणा करण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. वादळाचा केंद्रबिंदू हरिहरेश्वर, श्रीवर्धन या पट्ट्यात असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे आधी थोडे भीतीचे वातावरण होते.  परंतु निसर्ग चक्रीवादळ कोकण ते गुजरातमधील दमण या क्षेत्राला प्रभावित करु शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.