निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर बारा दिवस उलटून गेले तरी श्रीवर्धन तालुका अंधारातच

श्रीवर्धन: तीन जून रोजी श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळाची भयानकता एवढी होती की अनेक विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. काही ठिकाणी पोल बांगडी च्या

 श्रीवर्धन: तीन जून रोजी श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळाची भयानकता एवढी होती की अनेक विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. काही ठिकाणी पोल बांगडी च्या आकाराप्रमाणे गोल झालेले पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धन तालुक्यात जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी अगणित झाली आहे. महावितरण व महापारेषण या दोन्ही वीज कंपन्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तरीसुद्धा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याच्या उर्जा विभागाने श्रीवर्धन तालुक्याचा वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदळगाव ते पाभरे या टॉवर लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाभरे सबस्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे म्हसळा शहरामध्ये वीजपुरवठा सुरू झाला आहे. तर पाभरे ते श्रीवर्धन सबस्टेशन इन्कमिंग लाईनचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. श्रीवर्धन सबस्टेशनपर्यंत नवीन उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे पोल उभे करण्यात आलेले आहेत. या मार्गावरती विद्युत तारा खेचुन झाल्यानंतर श्रीवर्धन शहरातील पडलेले पोल उभे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. चक्रीवादळाचा तडाख्यामुळे सर्वत्र वीजेचे पोल पडल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर आज बारावा दिवस असूनदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत.

श्रीवर्धन तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून आठ ते दहा दिवस लागतील असे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे. मालेगाव व अन्य ठिकाणाहून लाईनमन श्रीवर्धन येथे काम करण्यासाठी बोलवण्यात आले आहेत. –  खांडेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, गोरेगाव