चक्रीवादळाच्या सहा दिवसानंतरही तळा तालुका अंधारातच, विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

तळा : निसर्ग चक्रीवादळाच्या सहा दिवसानंतरही तळा तालुका अद्यापही अंधारातच आहे.मात्र यामुळे विजेवर अवलंबून व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा

तळा : निसर्ग चक्रीवादळाच्या सहा दिवसानंतरही तळा तालुका अद्यापही अंधारातच आहे.मात्र यामुळे विजेवर अवलंबून व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्यासह तळा तालुक्यालादेखील बसला. यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या घरावरची छप्परे उडून वर्षभराचा अन्नधान्याचा साठा भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.काहींना तर आपले घर कोसळल्यामुळे इतरत्र आसरा शोधावा लागला. चक्रीवादळात वाडवडिलांपासून असलेले कलमी आंब्यांची व काजूची झाडे मुळापासून उपटून पडल्याने काहींवर तर दुःखाचे डोंगरच कोसळले.या आपत्तीमधूनही सावरून नागरिक आपापल्या कामधंद्याला लागले. मात्र चक्रीवादळाच्या सहा दिवसानंतरही तळा तालुक्यातील वीज पुरवठा अद्यापही सुरळीत झाला नसल्याने अनेक विक्रेते, दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रेते, कोल्ड्रिंक्स विक्रेते, बेकरी यांसारखे विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आहे. आधीच चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना आता विजेशिवाय व्यवसाय सुरू करता येत नसल्यामुळे आता स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. 

निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर विद्युत पोल पडले आहेत.यासाठी रोहा तालुक्यातील कामगारांची मदत घेतली आहे.तसेच कल्याण येथील कामगारांना देखील मदतीसाठी बोलावण्यात आले असून लवकरात लवकर शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल व त्यानंतर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. –  बी.माणवटकर, अभियंता महावितरण, तळा