कोरोनासंदर्भातील काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने असंतोष – जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

पोलादपूर : सध्या कोरोनाचे महाभयंकर असे संकट आपल्या देशावर आले असून आरोग्य कर्मचारी व पोलीस यांच्या बरोबरीने जिल्हा परिषद शिक्षकसुद्धा कोरोना नियंत्रणाचे काम करत आहेत. सध्या कोरोना या आपत्तीत शिक्षक

पोलादपूर : सध्या कोरोनाचे महाभयंकर असे संकट आपल्या देशावर आले असून आरोग्य कर्मचारी व पोलीस यांच्या बरोबरीने जिल्हा परिषद शिक्षकसुद्धा कोरोना नियंत्रणाचे काम करत आहेत. सध्या कोरोना या आपत्तीत शिक्षक चेकपोस्ट, अन्नधान्य वितरण, कोरोना नियंत्रण कक्ष, क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवणे अशी अनेक कामे करत आहेत. मात्र शिक्षकांचा होम क्वारंटाईन व्यक्तींशी प्रत्यक्ष संबंध येत असतो, तरीपण शिक्षक हे काम प्रामाणिकपणे करत आहेत. कोरोनाचे काम करत असणाऱ्या शिक्षकांना शासनाने कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण दिले नाही. तसेच मास्क, हॅन्डवॉश,सॅनिटायझर या मूलभूत सुविधासुद्धा शासन देत नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

सध्या ग्रामस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत महसूल गावनिहाय कोरोना नियंत्रण समित्या सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक,पोलीस पाटील, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक व शिक्षक हे काम करत आहेत. परंतु या समितीत फक्त शिक्षक व मुख्याध्यापक हेच काम करताना दिसत असून ग्रामसेवक यांना चार-चार ग्रामपंचायतीचा कारभार पाहायचा असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही.या साऱ्या गोष्टीचा शिक्षकांवर प्रचंड ताण येत आहे तरीपण शिक्षक आपत्ती व्यवस्थापनचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. परंतु हे सारे करत असताना शिक्षक एक माणूस असुन त्यालाही एक कुटुंब आहे हे शासनाने लक्षात घेऊन इतर कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांच्याही मागण्या मान्य कराव्यात, ही त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे.

 यामध्ये जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यातून वगळावे. मधुमेह, हृदयरोग व अपंग कर्मचारी यांना या कामातून तात्काळ वगळावे.महिला कर्मचारी यांना रात्रीची ड्युटी देऊ नये. शिक्षकांना मास्क, हॅन्डवॉश, सॅनिटायझर या वस्तू तात्काळ मिळाव्यात. शिक्षकांना ५०लाखांचे विमा संरक्षण द्यावे.चेकपोस्ट, क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवणे अशी कामे शिक्षकांना देण्यात येऊ नयेत. मे महिन्यातील वाहन भत्ता शिक्षकांना मिळावा.इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळावी. माध्यमिक व महाविद्यालयातिल शिक्षक व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनासुद्धा या कामात सामावून घ्यावे, अशा मागण्यांचे निवेदन अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे,अशी माहिती नवराष्ट्र प्रतिनिधीला देण्यात आली  आहे.