रोहा शहराची झालीया दैना, दखल कोणी घेईना ! भुयारी गटाराचीच ‘बायपास’, रस्ते बनले धोकादायक

रोहा: परवाच्या धुवांधार पावसात सबंध शहरात पाणी तुंबले. मुख्य बाजारपेठ यांसह सर्वच ठिकाणांना नदीचे स्वरूप आले. एवढे पाणी अडले कसे ? यावर अनेकांनी सोशल मीडियावर चर्चा केली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी कुंडलिकेच्या काठावर संवर्धनाच्या नावाखाली बांधलेली संरक्षण भिंत कारणीभूत असल्याचे सांगत कामावरच पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले. दुसरीकडे भुयारी ड्रेनेज गटाराच्या कामासाठी खोदलेले रस्ते, सर्वच रस्ते खड्डय़ात गेल्याने वाहतुकीला प्रचंड धोका निर्माण झाला. अशातच करोडो रुपये खर्चाच्या भविष्य नसलेल्या भुयारी गटाराची बायपास करण्याचा बाका प्रसंग रोहा अष्टमी नगरपरिषदेवर आल्याने चर्चेला एकच उधाण आले. एक्सल कॉलनी रस्त्यावरून जात असलेली ड्रेनेज भुयारी गटार वाहिनी पाण्याने तुडुंब भरली. हीच गटाराची वाहिनी पुढे मुख्य सांडपाणी वाहिनीला न जोडल्याने अखेर अडथळा निर्माण झाला. पर्यायाने गटाराच्या चेंबरमधून पाणी रस्त्यावर यायला प्रारंभ झाला. पाणी सर्वत्र तुंबल्याचे समोर आल्याने अखेर चेंबरलाच फोडून पाणी गटारात सोडण्याची नामुष्की नुकतीच नगरपरिषदेवर आली.

रोहा अष्टमी शहर समस्यांचे आगार झाले आहे. सर्वच रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडल्याने चालणेही मुश्किल झाले आहे. अनेकांना पाठदुखीला सामोरे जावे लागत आहे. भुयारी ड्रेनेजच्या कामासाठी सबंध शहरातील चांगले रस्ते फोडण्यात आले. फोडलेले रस्ते अद्याप दुरुस्त झाले नाहीत. याउलट भुयारी ड्रेनेज योजना अपयशी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने ही करोडो रुपयांची योजना नक्की कोणासाठी राबविली ? असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. याच भयानक स्थितीत यावर्षी नियोजनबद्ध गटारांची साफसफाई न झाल्याने शुक्रवारी एका तासाच्या मुसळधार पावसाने नगरपरिषदेची प्रतिष्ठा अक्षरशः चव्हाट्यावर आणली. सबंध शहरात पाणी का अडले, काही दुकानांत पाणी शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, याला जबाबदार कोण ? असे म्हणत सोशल मीडियावर अनेकांनी नदी संवर्धनाच्या संरक्षण भिंत कामावर आक्षेप घेतले. रोहा शहराची झालीय दैना, अशा टिकेतच भुयारी गटाराला बायपास करण्याचा बाका प्रसंग नगरपरिषदेवर आल्याने कोरोनाने आधीच वैतागलेल्या रोहेकरांना वाली कोण ? असे खेदाने बोलले जात आहे.

रोहा अष्टमी शहरासाठी करोडो रुपये खर्चिक ड्रेनेज भुयारी गटार योजना राबविण्यात आली. आतापर्यंत काही करोडो रुपये खर्ची पडले. याच ड्रेनेज भुयारी गटारावर शिवसेना मुख्यतः पत्रकारांनी जोरदार आक्षेप घेतले. पत्रकारांचे शंकानिरसन करण्यासाठी खा. सुनिल तटकरे यांनी मोठे तंत्रज्ञाना आमंत्रित केले. तरीही भुयारी गटार योजनेला भवितव्य नाही, असा आक्षेप कायम नोंदविण्यात आला. त्याचीच प्रचिती येत आहे.

भुयारी गटार कामासाठी फोडलेले रस्ते रोहेकरांना नेहमीच वेदना देत आहेत, याच वास्तवात एक्सल कॉलनी रस्त्यावरील नव्या योजनेतील भुयारी गटाराच्या चेंबरलाच फोडून बायपास मार्गे पाणी सार्वत्रिक गटाराला फिरविल्याने भुयारी गटार योजनेच्या कामावर गहन प्रश्नचिन्ह उभे राहिले.

भुयारी गटारालाच बायपास केल्याचे वृत्त समोर आल्याने रोहेकरांना पुढे अजून खूप काही बघायचे आहे, अशी बोचरी टीका तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी नगरपरिषदेच्या प्रतिनिधीवर केली. तर नदी संवर्धनातील संरक्षण भिंत धोक्याचा इशारा देत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी दिली. तर नेमके काय केले चेंबर फोडून पाणी बायपास केले का, याची माहिती घेतो असे सहा.अभियंता सुधीर भगत यांनी सलाम रायगडला सांगितले.

दरम्यान, सर्वच रस्त्यात भलेमोठे खड्ढे पडले, नव्या भुयारी गटारालाच बायपास करण्याची वेळ आली. पावसाचे पाणी संबध शहरात तुंबल्याचे भयावह समोर आल्याने शहराची झालीया दैना, दखल कोणी घेईना अशीच चर्चा सध्या सुरु आहे.