म्हसळ्यात गर्दी नियंत्रित करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ?

म्हसळा : म्हसळा तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील गर्दीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. दीड महिन्यांपासून नागरिकांनी राखलेला संयम आता कुठेतरी तुटल्यासारखा वाटतोय. पावसाळ्यात

 म्हसळा : म्हसळा तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून बाजारातील गर्दीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. दीड महिन्यांपासून नागरिकांनी राखलेला संयम आता कुठेतरी तुटल्यासारखा वाटतोय. पावसाळ्यात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात नागरिकांची तुफान गर्दी होत आहे. मात्र ही गर्दी कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही. संचारबंदी काळात अनेक खाजगी गाड्या रस्त्यावर खुलेआमपणे फिरत आहेत. या खुलेआम गाड्या फिरविणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्यांवर पोलीस प्रशासन पहिल्यासारखी कडक कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आता जणू काही रान मोकळे असल्यासारखे  धूम स्टाईलने गाडी चालवित आहेत. 

सरकाने परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची मुभा दिली आहे. मात्र यासाठी लागणारी कागदपत्रे व मेडीकल रिपोर्ट काढण्यासाठी परप्रांतीय व इतर नागरिकांना स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार व समन्वय नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. मेडिकल सर्टिफिकेटसाठी तीन दिवस गर्दीच गर्दी होत असून याठिकाणी सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा उडत आहे. मेडिकल चेकअपच्या ठिकाणी होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक महसूल विभाग, नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे कर्मचारी उपस्थित नसतात. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने जनता मात्र  बाजारात बिनधास्तपणे फिरत आहे तर जनतेला रोखण्यासाठी असलेले प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्त झालेली दिसत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने शहरात खाजगी वाहनाने बाजारात येतात. मग अशावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी तथा कोरोना संसर्ग सनियंत्रण पथकाचे ग्रामीण विभाग नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी असलेले बीडीओ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेले ग्रामपंचायत निहाय कोरोना संसर्ग सनियंत्रण पथक प्रमुख व कमिटी नेमके काय काम करतात हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जर गावागावात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या तर रोज वाढत असलेली बाजारातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. 

दोन दिवसांपूर्वी नगरपंचायतीने पत्रक काढले आहे. मात्र हे पत्रक फक्त नावाला आहे अशी चर्चा बाजारात सुरू आहे. नगरपंचायतने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन बाजारात कोणीच करताना दिसत नाहीत त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासन काहीच कारवाई का करीत नाही. तालुक्यातील ग्रामीण व शहरातील काही नागरिक तोंडाला मास्क किंवा रुमाल असे काहीच न बांधता बाजारात फिरतात त्यांच्यावरदेखील काही कारवाई नगरपंचायत करीत नाही. काही नागरिक कोरोना आजार संपला आहे किंवा तो आपल्याला होणारच नाही अशा आविर्भावात फिरत असल्याचे दिसून येतात. सतत होत असलेली गर्दी रोखण्यासाठी स्थानिक तहसीलदार, महसूल विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग यांनी अजून सतर्क राहून कडक निर्बध केले पाहिजेत.