आंबेवाडीमध्ये पोषण आहार महिना साजरा

रोहा: प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी(ambewadi) अंतर्गत आंबेवाडी नाका येथील अंगणवाडीत केंद्र शासनाच्या धोरणानुसार पोषण आहार महिना साजरा करण्यात आला. सही पोषण देश रोशन या उक्तीप्रमाणे आंबेवाडी नाका येथील अंगणवाडीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंगणवाडी सेविका पी. पी. सानप, आरोग्य सहाय्यिका आर. आर. पानसरे आरोग्यसेविका एच. डी. सतांमकर आरोग्य सेवक विशाल अंभोरे, एम जी पवार, शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता भोईर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  कोणत्या आहारामधून किती प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे मिळतात तसेच कर्बोदके व पिष्टमय पदार्थ कुठल्या आहारातून मिळतात याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता व लहान बालके यांनी समतोल आहार घ्यावा, असे सांगितले. तसेच कोरोना काळात आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कुठले आहार व इतर काय उपाययोजना कराव्यात तसेच आहाराचे आपल्या जीवनातील महत्व समजावून सांगितले.  कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बालके व पालक उपस्थित होते.