चवदार तळ्यात बुडून एकाचा मृत्यू; दारुच्या नशेत झाला घात, पोलिसांनी व्यक्त केला प्राथमिक अंदाज

घटनास्थळावर नगरसेवक संदीप जाधव, नगरसेवक बंटी पोटफोडे व स्थानिक प्रशासन उपस्थित होते. प्रशांत साळुंके यांनी या तरुणाच्या पोटातील पाणी बाहेर काढून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत त्या तरुणाला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

    महाड : महाड तालुक्यातील फौजी अंबावडे या गावातील ३८ वर्षीय तरुणाने दारुच्या नशेत चवदार तळ्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. महाड नगर परिषद पोलिस प्रशासन व साळुंके रेस्क्यू टीमच्या वतीने या तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

    महाड मधील चवदार तळ्यातील पाण्यात एक पुरुष तरंगत असल्याचे आज सकाळी १० वाजाण्याच्या सुमारास आढळून आल्याने महाड नगर परिषदेचे कर्मचारी पोलिस कर्मचारी व प्रशांत साळुंके यांनी होडीतून जाऊन या तरुणाला बाहेर काढले. प्रशांत साळुंके रेस्क्यू टीम मेंबर भुपेन्द्र पोटफोडे, अरबाजशेख यांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.

    घटनास्थळावर नगरसेवक संदीप जाधव, नगरसेवक बंटी पोटफोडे व स्थानिक प्रशासन उपस्थित होते. प्रशांत साळुंके यांनी या तरुणाच्या पोटातील पाणी बाहेर काढून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत त्या तरुणाला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र त्या ठिकाणी उपचार सुरु होण्यापूर्वीच या तरुणाची प्राणज्योत मालवली होती.

    तपासाअंती हा तरुण फौजी अंबावडे येथील शशिकांत चंद्रकांत कदम असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याने चवदार तळ्यात आत्महत्या का केली हे कारण समजू शकले नाही. या तरुणाला दारुचे व्यसन असल्याने दारुच्या नशेत पाण्यात पडून अथवा उडी घेतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.