महाड-मढेघाट-पुणे मार्गाचे केवळ आश्वासन; वरंधा घाटाचे अस्तित्व धोक्यात

वरंधा घाटाचे अस्तित्वच धोक्यात आलेले असताना एकीकडे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याचे तर दुसरीकडे या मार्गाला पर्यायी आणि जवळचा मार्ग म्हणून महाड वेल्हा पुणे या मढेघाटातून जाणाऱ्या मार्गाचे गाजर गेल्या अनेक वर्षांपासून महाडकरांना दाखविले जात आहे. हे गाजर दाखविणाऱ्यांमध्ये सर्वपक्षिय नेतेमंडळींचा सहभाग आहे मात्र हे काम तातडीने मार्गी लावावे अशी इच्छाशक्ती मात्र कुणामध्येही दिसलेली नाही.

 महाड : महाड – भोर – पंढरपूर मार्गातील वरंधा घाटाचे अस्तित्वच धोक्यात आलेले असताना एकीकडे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याचे तर दुसरीकडे या मार्गाला पर्यायी आणि जवळचा मार्ग म्हणून महाड -वेल्हा-पुणे या मढेघाटातून जाणाऱ्या मार्गाचे गाजर गेल्या अनेक वर्षांपासून महाडकरांना दाखविले जात आहे. हे गाजर दाखविणाऱ्यांमध्ये सर्वपक्षिय नेतेमंडळींचा सहभाग आहे मात्र हे काम तातडीने मार्गी लावावे अशी इच्छाशक्ती मात्र कुणामध्येही दिसलेली नाही.  सध्या महाड येथून पुणे येथे जाण्यासाठी महाड वरंधा घाट भोर मार्गे पुणे हा एक आणि महाड माणगांव ताम्हीणी घाटमार्गे पुणे असे दोन जवळचे पर्याय उपलब्ध आहेत. महाड पोलादपूर महाबळेश्वर मार्गे पुणे हा तिसरा पर्याय उपलब्ध असला तरी तो फारसा व्यवहार्य नाही.

महाड भोर मार्गे पुणे हे अंतर १३० किलोमिटरचे आहे. तर महाड ताम्हीणी मार्गे पुणे हे अंतर सुमारे १२३ किलोमीटर आहे. ताम्हीणी घाट मार्ग अस्तित्वात येण्याच्या कितीतरी आधीपासून महाड वेल्हे पुणे या मढेघाट मार्गाची मागणी होत आहे आणि हे काम मार्गी लावण्याची आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा शक्ती कुणीही दाखविलेली नाही.  महाड वेल्हे मार्गे पुणे हा मढे घाटातून जाणारा प्रस्तावित मार्ग केवळ १०६ किलोमिटरचा आहे. अंतर कमी असल्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. त्याच प्रमाणे धोकादायक स्थितीत असलेल्या वरंधा घाटाला चांगला पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. शासनाने या मार्गासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती. त्यातून महाड हद्दीमध्ये काही काम करण्यात आले. मात्र ते अत्यंत किरकोळ स्वरूपाचे आहे. नंतर या कामाला ना निधी मिळाला ना गती. पण प्रत्येक निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष हा मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन देतात.         

  या मार्गाचा काही भाग हा वनविभागाच्या हद्दी मधून जातो. तेथेच घोडे अडल्याचे बोलले जाते. वास्तविक शासन स्तरावरून बांधकाम विभाग आणि वनविभागाने एकत्र बसून ही अडचण दूर करणे अपेक्षित होते. पण रायगडच्या राजकीय इतिहासात महाडची उपेक्षा करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्याचाच अनुभव या कामामध्येही महाडकरांना येतो आहे. वरंधा घाट अर्धाअधिक निकामी झाला आहेच; आता ताम्हीणी मार्गाचे महत्व कमी होवू नये यासाठी महाड – वेल्हे – पुणे या मार्गाचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला असल्याची चर्चा ऐकावयास मिळते.  या मार्गाला ऐतिहासिक महत्व आहे.

शिवकाळात घाट माथ्यावरून कोकणात येण्यासाठी जे प्रमुख मार्ग होते त्यापैकी मढेघाट हा एक मार्ग. या घाट मार्गातून घाटमाथा आणि कोकणात व्यापारउदीम होत असे. नरवीर तानाजी मालुसरे यांना सिंहगड मोहिमेत वीरमरण आल्यानंतर त्यांचे पार्थिव (तत्कालीन शब्द मढे.) याच घाटमार्गातून पोलादपूर तालुक्यात असलेल्या त्यांच्या उमरठ या गावी नेण्यात आला होता. तेव्हा पासून हा घाट मढेघाट म्हणून ओळखला जातो.