paintings on wall

शासनाच्या शहर स्वच्छता अभियान स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे अव्वलस्थान पटकवणाऱ्या ऐतिहासिक महाड(mahad) शहरात नगर परिषदेकडून साकारण्यात येत असलेल्या भित्तीचित्रांद्वारे(paintings on wall) स्वच्छता आणि पर्यावरणविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

महाड : शासनाच्या शहर स्वच्छता अभियान स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे अव्वलस्थान पटकवणाऱ्या ऐतिहासिक महाड(mahad) शहरात नगर परिषदेकडून साकारण्यात येत असलेल्या भित्तीचित्रांद्वारे(paintings on wall) स्वच्छता आणि पर्यावरणविषयी जनजागृती करण्यात येत आहे. सातारा येथील प्रसिद्ध चित्रकार मोहन जगताप यांच्या कुंचल्यातून ही भित्तीचित्रे रेखाटली जात असून ही चित्रे शहरवासियांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांचेही खास आकर्षण ठरली आहेत.

शासनाच्या शहर स्वच्छ अभियानाचा एक भाग म्हणून महाड नगरपरिषदेकडून शहरातील भिंतींवर स्वच्छता, पर्यावरण विषयी जनजागृती केली जात आहे. गांधारी नाक्याकडून शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकांच्या भिंतींसह उद्यान, सार्वजनिक ठिकाणच्या मोक्याच्या भिंती तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या भिंतींवर ही चित्रे रेखाटली जात आहेत.

महाड नगर परिषद हद्दीतील भिंतींवर चित्रे रेखाटण्याचे हे काम यंदा सातारा येथील मोहन जगताप या चित्रकाराला देण्यात आले आहे. मोहन जगताप यांना महाडसह सुमारे पंधराहून अधिक नगरपरिषदांमधील भित्तीचित्रे काढण्याचे काम मिळाले आहे. मोहन जगताप हे आपल्या कुंचल्यातून शहरातील भिंतींवरील चित्रांद्वारे स्वच्छता, आरोग्य पर्यावरण, पशुधन, पक्षी तसेच संस्कृती दर्शन घडवत आहेत त्यामुळे या चितारलेल्या भिंती अक्षरश: बोलक्या बनल्या आहेत.

या चित्रे रेखाटलेल्या भिंतीजवळ जाऊन तरूण तरुणींसह शहरात येणाऱ्या पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील अनावर होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात रेखाटलेल्या या आकर्षक भित्तीचित्रांची माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी जीवन पाटील, बांधकाम सभापती प्रमोद महाडीक,आरोग्य सभापती दादा राक्षे आदींनी पाहणी केली व चित्रकार मोहन जगताप यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

मोहन जगताप यांनी सांगितले की, हे काम मी अनेक शहरांमध्ये करीत असलो तरी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक शहरात आपली कला सादर करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.