पनवेल महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी स्वीकारला पदभार -जुन्या आयुक्तांची बदली रद्द करण्याची आ. ठाकूर यांची मागणी

पनवेल :पनवेल महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला असतानाच पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे

पनवेल :पनवेल महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला असतानाच पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.    

 मंगळवारी १९ मे रोजी रात्री उशिरा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात येऊन उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल येथे बदलीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती वर्तमानपत्रात आल्याने भल्या पहाटे पनवेल मध्ये नागरिकात या बदलीची उलट -सुलट चर्चा सुरू झाली. गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त म्हणून कामभार हाती घेतल्यापासून महानगरपालिका हद्दीतील अनेक विकासकामांना गती देण्याचे आणि प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम केले असल्याने त्यांची  जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.  बुधवारी दुपारी नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महापालिकेत येऊन गणेश देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल उपस्थित होत्या. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्त गणेश देशमुख यांची कामामुळे जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व त्याला आळा बसण्यासाठी ते चांगले प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळात महापालिका आयुक्तांची बदली करणे हा पनवेलकरांवर अन्याय आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणाऱ्या आयुक्तांची  झालेली बदली रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे .