पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाढतोय कोरोनाचा संसर्ग – आज ८ नव्या रुग्णांची नोंद

पनवेल : पनवेल तालुक्यात उलवे , करंजाडे आणि पाली देवद ( सुकापूर ) येथे प्रत्येकी १ अशा ३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर महापालिका क्षेत्रात ५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी

 पनवेल : पनवेल तालुक्यात उलवे , करंजाडे आणि पाली देवद ( सुकापूर )  येथे प्रत्येकी १ अशा ३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर महापालिका क्षेत्रात ५  पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी कामोठ्यात २, कळंबोली, तळोजा आणि नवीन पनवेल प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. आज तालुक्यात कोरोनाचे १३४   रुग्ण तर महापालिका क्षेत्रात १०७ रुग्ण झाले आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे  सेक्टर -३५  येथील संकल्प सोसायटीतील ५८  वर्षीय व्यक्ती मुंबईला धारावी बस डेपोत चालक आहे. सेक्टर ६ शीतलधारा कॉम्प्लेक्समधील ५२ वर्षीय व्यक्ती वडाळा बस डेपोत इलेक्ट्रीक विभागात चालक आहे  या दोघांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. नवीन पनवेल सेक्टर ४ मधील पुष्पळता सोसायटीतील ६५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे त्यांच्या वडाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व  घरातील ३ व्यक्तींना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली आहे. कळंबोली सेक्टर ४ ई मधील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असून ती महिला कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये गेली होती. तळोजा पानाचंद सेक्टर ९  मधील २८ वर्षीय महिला वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे  आजपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील ११६६  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी २२  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ६६ जणांवर उपचार सुरू असून ३९ जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 पनवेल ग्रामीण मध्ये आज  3  नवीन रुग्ण सापडले आहेत.  त्यामध्ये पाली देवद ( सुकापुर ) , करंजाडे आणि उलवेमधील प्रत्येकी १ रुग्ण आहे. करंजाडे  सेक्टर ४ येथील  मिताली होम मधील एका पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. उलवे सेक्टर २३ येथील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणार्‍या व्यक्तीचा ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे . पाली देवद सुकापूर येथील साक्षी पार्क २ येथील ४० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला  असून तिच्या पतीला यापूर्वी कोरोनाची बाधा झालेली आहे.  आतापर्यंत ग्रामीणमध्ये २७ कोरोना रुग्ण झाले आहेत.