कामोठ्यात कोरोनाचे २ बळी, आज ७ रुग्णांची पनवेलमध्ये नोंद – रायगड जिल्ह्याची संख्या २१४

पनवेल :कामोठ्यात शनिवारी कोरोनाचे २ बळी गेले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ५ नवीन रुग्ण सापडले . त्यापैकी ३ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर पनवेल ग्रामीण मध्ये २ नवीन रुग्ण

पनवेल  :कामोठ्यात शनिवारी कोरोनाचे २ बळी गेले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ५ नवीन रुग्ण सापडले . त्यापैकी ३ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर पनवेल ग्रामीण मध्ये २ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल शहरातील रुग्णाची संख्या १४३  झाली आहे. तर तालुक्यात कोरोनाचे १९० रुग्ण झाले आहेत  तपासणी अहवालात तफावत आणि विलंब या कारणास्तव थायरोकेअर लॅबोरेटरी, तुर्भेला महापालिका हद्दीत तपासणीला बंदी करण्यात आली असून एकल दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुका वगळता कोठेही नवीन रुग्ण नाही . रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१४ झाली आहे.   

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठेमध्ये शनिवारी  दोघांचा मृत्यू झाला आहे  याशिवाय खारघर मध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. कामोठे सेक्टर ३४ मधील मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ३९ वर्षीय  महिलेचा मृत्यू झाला. कामोठे सेक्टर ११ आशियाना कॉम्प्लेक्समधील ५७ वर्षीय व्यक्ती कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होती तिचा आज मृत्यू झाला. कळंबोली  येथील सेक्टर १० आय मधील रहिवाशी असलेले पोलीस  उप निरीक्षक आणि खरघर येथील सेक्टर ११ मधील फ्रेंड सोसायटी मध्ये राहणारे पोलीस  उप निरीक्षक यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दोघेही चेंबुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कामोठे सेक्टर १८ मध्ये राहणार्‍या आणि पोलीस हेड क्वार्टर , मरोळ , अंधेरी येथे कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. खारघर येथील सेक्टर १२ सूर्योदय सोसायटीमधील ४३ वर्षीय महिला होम नर्सचे काम करते तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  ती वांद्रे यथे काम करीत असलेल्या कुटुंबातील व्यक्तिला कोरोंनाची बाधा झालेली होती. कामोठे सेक्टर ९ क्षीरसागर सोसायटीच्या ४५ वर्षीय मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत मानखुर्द शाखेत काम करणार्‍या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे.

आजपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १३८८  जणांची कोरोनाची  टेस्ट केली आहे. त्यापैकी ३५ जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्ह पैकी ८७ जणांवर उपचार सुरू असून ४९  रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तपासणी अहवालात तफावत आणि विलंब या कारणास्तव थायरोकेअर लॅबोरेटरी, तुर्भेला महापालिका हद्दीत तपासणीला बंदी करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत एकल दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

पनवेल ग्रामीण मध्ये आज २  नवीन रुग्ण सापडले आहेत. उसर्ली खुर्द  येथील नीळकंठ विश्व फेज -२ मधील ३६  वर्षीय महिला मुंबईला हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या महिलेला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. विचुंबे येथिल ज्ञानेश्वर माऊली हौ. सोसायटीत राहणार्‍या ६० वर्षीय व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत शनिवार ९ मे पासून  मंगळवार १२ मे पर्यंत  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बंद पाळला जाणार आहे. बुधवार १३ मे पासून किराणा , दूध आणि भाजी दुकाने सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. आतापर्यंत ग्रामीणमध्ये  कोरोनाच्या ४७  रुग्णांपैकी ७  बरे झाले आहेत . रायगड जिल्ह्यात आज पनवेल तालुका वगळता कोठेही नवीन रुग्ण नाही.  जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २१४  झाली असून बळींची संख्या १० झाली आहे.