पावसाळयापूर्वी महापालिकेची व्यवस्था सुसज्ज करण्यासाठी सभागृह नेत्यांचा पुढाकार

पनवेल : सभागृह नेते परेश ठाकुर यांनी पावसाळयापूर्वी पनवेल महापालिकेची व्यवस्था योग्य प्रकारे सुसज्ज करण्यासाठी पुढाकार घेतला असून नगरसेवकांना आपल्या विभागात कोणती कामे महापालिकेने आणि सिडकोने करणे

पनवेल : सभागृह नेते परेश ठाकुर यांनी पावसाळयापूर्वी पनवेल महापालिकेची व्यवस्था योग्य प्रकारे सुसज्ज करण्यासाठी पुढाकार घेतला असून नगरसेवकांना आपल्या विभागात कोणती कामे महापालिकेने आणि सिडकोने करणे आवश्यक आहेत याची यादी सादर करण्यास ५ जून रोजी महापौर दालनात झालेल्या बैठकीत सांगितले. 

पनवेल महापालिका क्षेत्रात मागील वर्षी पावसाळ्यात अनेक वेळा पाणी तुंबल्याने पूर सदृश्य परिस्थिति निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान झाले होते.यावर्षी पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पावसाळयापूर्वी महापालिकेने आणि सिडकोने कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ चर्चा करून त्यांना कामांची यादी देण्यास सांगितले.सिडकोच्या कामांची यादी आमदारांकडे देण्यात येणार आहे तर महापालिकेच्या कामाबाबत आयुक्तांजवळ चर्चा केली जाणार आहे. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उप महापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिति ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे , माजी उप महापौर चारुशीला घरत, नगरसेविका कुसुम पाटील, दर्शना भोईर, नगरसेवक अनिल भगत, नितिन पाटील, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत आणि विजय चिपळेकर उपस्थित होते. यावेळी परेश ठाकुर यांनी शिक्षण अधिकार्‍यांकडून महापालिकेच्या १० आणि जिल्हा परिषदेच्या महापालिका हद्दीत आलेल्या ५०  शाळांची माहिती घेऊन तेथे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी  काय व्यवस्था आहे,  स्वच्छता गृहांची  काय अवस्था आहे याबाबत स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले. त्याठिकाणी पावसाळ्यापूर्वी तातडीने कामे करून घेण्याबाबत आयुक्तांजवळ चर्चा करून ती कामे पूर्ण करून घेण्याचे ठरले.  मध्यान्ह भोजना बाबत ही माहिती घेण्यात आली. 

महापालिका हद्दीत आलेल्या ५० शाळा ताब्यात देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे महापौरांनी अनेक वेळा पत्र व्यवहार केला परंतु त्यांच्या कडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. महापौर जिल्हा परिषदेला पुन्हा शाळा ताब्यात देण्यासाठी पत्र देणार आहेत. या शाळांची जवाबदारी आमच्याकडे येणार असल्याने त्यांची आजची स्थिति काय आहे. तेथे कोणते काम करायला पाहिजे याची माहिती घेण्यास सांगितले आहे. – परेश ठाकूर , सभागृह नेते