अत्यावश्यक सेवांची दुकाने ४ मे ला बंद केल्यास कारवाई- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बंदच्या इशाऱ्याला आयुक्तांचे प्रत्युत्तर

पनवेल: पनवेल शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना जसे मेडिकल, हॉस्पिटल, डेअरी, किराणा दुकाने, भाजी मंडई इत्यादी पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. सर्वच बंद करून नागरिकांची गैरसोय करू नये.

 पनवेल: पनवेल शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना जसे मेडिकल, हॉस्पिटल, डेअरी, किराणा दुकाने, भाजी मंडई इत्यादी पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. सर्वच बंद करून नागरिकांची गैरसोय करू नये. कोणालाही वेठीस धरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका. प्रशासनाचे काम कोणीही हातात घेऊ नये असे सांगतानाच ४ मे रोजी दुकाने बंद केल्यास साथ रोग प्रतिबंधक आणि  आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कायद्यानुसार दुकानदारांवर कारवाईचा इशारा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे. 

 पनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जाणार्‍यांमुळे महापालिका क्षेत्रात कोरोंनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शासनाने उद्योजकांना जो नियम लावला आहे, त्याचप्रमाणे या कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकुर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली होती.  मुख्यमंत्री आणि बीएमसीने विचार करून तातडीने पावले उचलली नाहीत, तर ४ मेपासून पनवेलमधील सर्व व्यवहार बंद करावे लागतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी १ मे रोजी फेसबुक लाईव्हरून पनवेलकरांशी संवाद साधताना सांगितले होते .त्याबाबत पनवेल मध्ये उलट -सुलट चर्चा सुरू होती महापालिका आयुक्त गणेश देशमुख याबाबत स्पष्टीकरण करताना  अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना जसे मेडिकल, हॉस्पिटल , डेअरी, किराणा दुकाने, भाजी मंडई इत्यादी पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. वाढवलेल्या लॉकडाऊनचे पूर्वीप्रमाणेच पालन करावे. महानगरपालिका क्षेत्रात पनवेल महानगरपालिकेने संपूर्ण बंदची कोणतीही सूचना दिलेली नाही. प्रशासनाचे काम कोणीही हातात घेऊ नये. लोकांनी स्वतःहून घराबाहेर न पडणे उत्तमच आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूची दुकाने कोणी जबरदस्ती करून बंद करू नये. जीवनावश्यक बाबींची दुकाने सुरूच ठेवावीत.  कारण अशी दुकाने बंद केल्यामुळे खरेदीसाठी गर्दी होईल व साठेबाजी व कृत्रिम टंचाई होईल. तसेच जादा भावाने माल विकला जाईल. जर अनावश्यक गर्दी झाली तर उलट संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे कोणीही घराबाहेर अनावश्यक पडू नये. अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.फक्त चार दिवस बंद आणि परत परिस्थिती जैसे थे असे व्हायला नको. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून शासनाने जाहिर केलेले लॉकडाऊनचे नियम नागरिकांनी काटेकोरपणे पाळावेत.कोरोना विषाणू संक्रमण होऊ नये अथवा फैलावू नये यासाठी यापूर्वी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.दुकाने बंद केल्यास साथ रोग प्रतिबंध कायद्यानुसार आणि आपत्कालीन व्यवस्थापन  नियंत्रण कायद्याखाली दुकानदारांवर कारवाईचा करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.