पनवेल रेल्वे स्टेशनजवळील वन रुपी क्लिनिक बंद, सर्वसामान्यांचे हाल

पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेल बाजूला प्रवाशांसाठी वन रूपी क्लिनिक सुरू करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर खाजगी डॉक्टरची फी न परवडणार्‍या सर्वसामान्य माणसाला

 पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेल बाजूला प्रवाशांसाठी वन रूपी क्लिनिक सुरू करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर खाजगी डॉक्टरची फी न परवडणार्‍या सर्वसामान्य माणसाला त्याची गरज असताना येथील डॉक्टर हे क्लिनिक बंद करून बसल्याने त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

 पनवेल रेल्वे स्टेशनवर रोज लाखो प्रवाशी येत असतात. अनेकवेळा अपघात होतात किवा एखाद्या प्रवाशाची तब्येत प्रवासा दरम्यान बिघडल्यास त्याला वैद्यकीय मदत मिळण्यासाठी  या स्टेशनवरील फलाटावर प्रवाशांसाठी दवाखाना सुरू करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली होती. आमदार प्रशांत ठाकुर यांनी रेल्वे  मंत्री पीयूष गोयल यांना त्यासाठी पत्र दिले होते. सप्टेंबर २०१९  पासून  मॅजिक डील  ही संस्था  वन रूपी क्लिनिक  याठिकाणी चालवीत आहे. येथे तपासणी फी एक रुपया असून कमीत कमी दरात इसीजी, रक्त तपासणी , ड्रेसिंग , रक्तदाब तपासणी, युरिन, सलाईन , सारख्या अनेक तपासण्या कमी दरात करून मिळण्याची सोय आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला.पनवेल महापालिका क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे  रुग्ण सापडले. त्यामुळे येथील उप जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर जिल्हा कोव्हिड रुग्णालयात करण्यात आले. अशावेळी सामान्या माणसाला वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी खाजगी दवाखाने बंद केल्यास कारवाईचा इशारा महापालिका आयुक्तांनी शहरातील डॉक्टरांना दिला. पण त्याचवेळी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील गोरगरीबांना परवडणारे  वन रूपी क्लिनिक बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून ते त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.  याबाबत बाजूच्या मेडिकलमध्ये चौकशी केली असता डॉक्टरांना भीती वाटते म्हणून दवाखाना बंद असल्याचे त्यांनी सांगितले.