पनवेल एस. टी. आगारात गावी जाण्यासाठी गर्दी – प्रशासनाच्या घोळामुळे नागरिकांचा भ्रमनिरास

पनवेल : राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी गाडया सोडण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने पनवेल आगारात आज सकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली

पनवेल : राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी गाडया सोडण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने पनवेल आगारात आज सकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. आज कोणतीही गाडी नसल्याचे समजल्यावर अनेक जण तेथील वाहतूक नियंत्रकांजवळ वाद घालताना दिसत होते. त्याठिकाणी गावाला जाण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे पास आवश्यक असल्याचे समजल्यावर पास घेण्यासाठी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यातही अनेकांनी धाव घेतली पण हाती काहीच न लागल्याने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली.  

राज्याचे परिवहन मंत्री आणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्याच बरोबर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी गाडया सोडण्याची घोषणा केली.त्यामुळे सोमवारी सकाळी पनवेल आगारात अनेकांनी आपल्या गावाला जाण्यासाठी गर्दी केली. त्याठिकाणी प्रवास करण्यासाठी पास आवश्यक असल्याचे समजल्यावर अनेकांनी तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यात धाव घेतली त्याठिकाणी आमच्याकडून कोणतेही पास दिले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे गावाला जाण्याच्या तयारीत आलेल्या अनेकांना निराश व्हावे लागले. प्रशासनाने एस.टीने जाण्यासाठी पास कोठे उपलब्ध होतील याची स्पष्ट माहिती न दिल्याने अनेकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.  

याबाबत आगार प्रमुखांना विचारले असता आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे पनवेलहून मुंबईतील हॉस्पिटल,पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रोज १५० फेर्‍या सुरू केल्या आहेत . आमचे अनेक कर्मचारी आपल्या गावाला अडकलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे कर्मचारी ही उपलब्ध नाहीत. उपलब्ध असलेल्या २५-३० चालक – वाहकांकडून फेर्‍या पूर्ण करीत आहोत. याशिवाय शासनाच्या आदेशाप्रमाणे गाड्या उपलब्ध करून देत आहोत. प्रवाशांच्या २२ जणांच्या ग्रुपला शासनाने पास घेऊन किलोमीटर प्रमाणे शेवटच्या ठिकाणचे भाडे आकारून गाडी देण्यास परवानगी दिली आहे. सद्य  स्थिति आमच्याकडे गाडी आणि कर्मचारी नसले तरी असे बुकिंग आल्यास आम्ही व्यवस्था करू. पण इतर कोणत्याही ठिकाणासाठी गाडी सोडण्यास सांगितलेली नसताना .प्रवाशी मात्र येथे येऊन आमच्या कर्मचार्‍यांजवळ वाद घालीत आहेत. 

 मी एका कंपनीत इंजिनियर आहे. देवदला राहतो होळीसाठी गावाला गेलो तेव्हा ३ वर्षीची मुलगी कोल्हापूरला ठेवली होती.लॉकडाऊनमुळे ती अडकली आहे. गाड्या सोडणार म्हणून आलो. दोन दिवस पास घेण्यासाठी तहसील कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात गेलो पण दोन्ही ठिकाणी आमच्याकडे येऊ नका असे सांगून हाकलून लावले.पास कोठे मिळेल याबाबत ही माहिती देण्यास तयार नाहीत.-  अशोक शिंदे, प्रवासी