मध्य प्रदेशच्या १२०० व्यक्तींना घेऊन पनवेलहून रेवा येथे रेल्वे रवाना

पनवेल: लॉकडाऊनमुळे नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील तब्बल बाराशे जणांना घेऊन आजपहाटे ०.४५ वाजता पनवेल स्टेशनवरुन विशेष रेल्वे मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील रेवाला

 पनवेल: लॉकडाऊनमुळे नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील तब्बल बाराशे जणांना घेऊन आज पहाटे ०.४५ वाजता पनवेल स्टेशनवरुन विशेष रेल्वे मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील रेवाला रवाना झाली .त्यांच्या तिकिटाचा आणि जेवणाचा खर्च जिल्हाधिकार्‍यांनी दिला. स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी  तब्बल ४२  दिवसांनी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.

यावेळी  पनवेल स्टेशनवर कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप आदी उपस्थित होते.

 कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मध्यप्रदेश येथील काही मजूर रायगड जिल्ह्यातही अडकले होते. लॉकडाऊनचा  कालावधी वाढविल्यानंतर  मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले. केंद्र शासनाने परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यास परवानगी दिल्यावर रायगड जिल्ह्यातून १३ हजार ४४ मजुरांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी  परवानगी मागितली होती. त्यापैकी १ हजार ५८५ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून  ४ हजार ६५३ जणांना परवानगी देण्यात आली . मध्यप्रदेश राज्यातील तब्बल १ हजार २०० मजूर/व्यक्तींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी  विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून समन्वयाने  बुधवारी पहाटे  पनवेल स्टेशन वरुन त्यांच्यासाठी गाडी सोडण्यात आली.  रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, पनवेल तालुक्यातील विविध भागामधून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली तर मध्यप्रदेश शासनाने या मजूर/व्यक्तींचा रेल्वेने जाण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्विकारली. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहेत.

 यावेळी उपस्थित सर्वांकडूनच सोशल डिस्टन्सिंंगचे काटेकोर पालन करीत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने या प्रवाशांना रेल्वेत सुखरुप बसविण्यात आले.रेल्वे विभागाने रेल्वेगाडी सॅनिटाईझ करून  रेल्वे स्थानकावर निर्जंतूकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. प्रवाशांना मास्कचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते,  शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे,  प्रशासनाचे, रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे  आभार मानले.