पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांना सुरुवात

पनवेल : कोरोनाचे संकट वाढत असतानाच पावसाळा जवळ आल्याने रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या निर्देशानुसार पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीत पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली

पनवेल : कोरोनाचे संकट वाढत असतानाच पावसाळा जवळ आल्याने रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या निर्देशानुसार पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीत पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली असल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी.बी. तेटगुरे यांनी दिली. पनवेल तालुक्यात कोरोनाचे १८० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे ४५ रुग्ण झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पावसाळा जवळ आल्याने तालुक्यात पावसाळापूर्व कामे वेळेत करण्याचे निर्देश रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी दिले. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी त्यांची साफसफाई, हात पंप दुरूस्ती, जिओ फेंसिंग ॲपचा वापर करून  करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही साथीचा प्रसार होऊ नये यासाठी जंतूनाशकाची आणि धुराची फवारणी करणे, ग्रामपंचायत हद्दीतील नाले सफाई करणे, विहीरीतील गाळ काढणे,  पाण्यात टाकण्यासाठी आवश्यक टी.सी.एल चा साठा करणे  त्यासाठी जवाबदार व्यक्तीची नेमणूक करून त्यास मासिक सभेची मान्यता घेणे . पावसाळयात पाणी साचू नये म्हणून नाले आणि गटारे साफ करणे, डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍याची विल्हेवाट लावून स्वच्छता राखण्याची कामे करण्यात येत आहेत.