मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी आई-वडील घेताहेत मेहनत…..

महाड येथे सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण देण्याची सुविधा नाही. त्यासाठी पनवेल येथील पनवेल क्रिकेट ॲकॅडमी मध्ये त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय विश्वास देवळेकर यांनी घेतला. ऑक्टोबर २०१९ पासून रुद्राचे पनवेल येथे प्रशिक्षण सुरू झाले. तेथे सागर कांबळे हे त्याला प्रशिक्षण देत होते. विश्वास देवळेकर यांच्यासाठी पनवेल येथील प्रशिक्षण सोपे नव्हते. महाड औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात ते काम करतात.

महाड : मुलांचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी आई-वडील प्रचंड श्रम, मेहनत आणि वेळप्रसंगी त्याग देखील करीत असतात. महाड तालुक्यातील आकले या छोट्याश्या गावी देखील असेच एक दांपत्य असून, मुलातील क्रिकेटपटू होण्याचे गुण पाहून, त्याला क्रिकेटपटू म्हणून घडविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. महाड येथील विश्वास देवळेकर हे एक नामांकित टेनिसबॉल क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातील हिच क्रीडा नैपुण्य त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा रुद्र याच्यामध्ये उतरले आहेत. मात्र मुलाने आपल्यासारखे टेनिस बॉल क्रिकेट न खेळता, सीझन बॉल क्रिकेट खेळावे, रणजी सामने खेळावेत यासाठी विश्वास देवळेकर यांनी त्याला घडविण्याचे काम हाती घेतले आहे.

महाड येथे सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण देण्याची सुविधा नाही. त्यासाठी पनवेल येथील पनवेल क्रिकेट ॲकॅडमी मध्ये त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय विश्वास देवळेकर यांनी घेतला. ऑक्टोबर २०१९ पासून रुद्राचे पनवेल येथे प्रशिक्षण सुरू झाले. तेथे सागर कांबळे हे त्याला प्रशिक्षण देत होते. विश्वास देवळेकर यांच्यासाठी पनवेल येथील प्रशिक्षण सोपे नव्हते. महाड औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात ते काम करतात. रुद्रला दर शनिवार, रविवार ते दुचाकीने पनवेल येथे नेत होते. शनिवारी महाड इथून निघायचे आणि रविवारी सायंकाळी महाड येथे परतून रात्रपाळी साठी कारखान्यात कामाला जायचे असा परिपाठ त्यांनी दोन महिने केला.

दोन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, सागर कांबळे यांनी रुद्रमधील स्पार्क ओळखला. त्याला दररोज सराव मिळाला तर तो एक चांगला क्रिकेटपटू बनू शकतो असे सांगत पनवेल येथे वास्तव्याला येण्याचा सल्ला त्यांनी विश्वास देवळेकर यांना दिला.विश्वास देवळेकर यांच्यासाठी हे स्थलांतर सोपे नव्हते आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे ही नव्हते तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाला पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. एकट्याच्या उत्पन्नात महाड आणि पनवेल अशी दोन घरे चालविणे, प्रशिक्षणाचा खर्च भागविणे शक्य नव्हते त्यावरही त्यांनी उपाय शोधला. बँकेकडून कर्ज काढून त्यांनी पतंजलीच्या उत्पन्नाची एजन्सी घेतली. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. दुर्दैवाने मार्चमध्ये राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सुरू झाले आणि हा व्यवसायही अडचणीत आला. पण विश्वास देवळेकर यांनी धीर सोडला नाही.

त्यांनी त्यांचे कुटुंब पुन्हा महाडला आणले आणि घरी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली रुद्राचा सराव घेण्यास प्रारंभ केला. त्यासाठी घरासमोरील अंगणात त्यांनी नेट बांधले. पावसाळ्यातही सरावात खंड पडू नये म्हणून अंगणात ताडपत्री ची शेडही टाकली. सध्या रुद्र या शेडमधील नेट मध्ये दररोज न चुकता सराव करतो आहे.

प्रतिकूल परिस्थितीत रुद्रचा सुरू असलेला सराव आणि विश्‍वास देवळेकर त्याच्यावर घेत असलेली मेहनत महाडकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. जर महाडमधील एखाद्या कारखान्याने रुद्र ची स्पॉन्सर शिप घेतली तर रुद्र च्या क्रिकेट नैपुण्याला वाव मिळत, केवळ रणजीतच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघातून आपली चमक दाखवण्याची संधी त्याला निश्चित मिळू शकेल.