कोरोना नियंत्रणासाठी तातडीने कडक उपाययोजना करा – सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, टेस्टचे रिपोर्ट लवकर मिळून रूग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था

 पनवेल : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, टेस्टचे रिपोर्ट लवकर मिळून रूग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. 

सभागृह नेते परेश ठाकुर यांनी आयक्त सुधाकर देशमुख यांची  महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, पोलीस उपायुक्त दुधे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील आदीं समवेत भेट घेतली . आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची दर दिवसागणिक १०० ने भर पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासक म्हणून आपण या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक पाऊले उचलणे हे आता काळाची गरज बनून गेली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत कडक पद्धतीचे लॉकडाऊन अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. हे लॉकडाऊन किमान सात दिवसाचे असावे ज्यामुळे ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणण्यास मदत होईल. जर काही कारणामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात समस्या असेल तर मार्केट परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यास आणि कोरोनाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्यास प्रयत्न करावे. 

 त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची जास्त प्रमाणात कोरोना चाचणी घेणे व त्यांचे रिझल्ट्स लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे व त्या रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दॅवाने असे घडताना दिसून येत नाही. त्यामुळे  रुग्णसंख्या वाढत असल्याचे आढळून येत आहे. कामातील ही बेपर्वाई  व दिरंगाई निषेधार्थ आहे.  जास्तीत जास्त संख्येच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधोल रुग्णांचा शोध घेणाऱ्या यंत्रणांना काम तत्परतेने करण्याचे आदेश द्यावेत. तसेच टेस्टचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश तपासणी लॅबना द्यावेत व बाधित रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशीही महत्वपूर्ण मागणी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केली आहे.  यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले.