कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा महाडमध्ये वाढले रुग्ण, तालुक्यात आढळलेल्या २२ कोरोनाबाधितांपैकी १७ जण महाड शहरातील नागरिक

संपुर्ण महाड तालुक्यात आज २२ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील(corona patients in mahad) असल्याचे समजते.

  महाड: गेल्या एक महिन्यापासून राज्यात व देशात सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अत्यंत धिम्या गतीने फोफावत चाललेल्या संसर्गाने आज प्रथमच महाडमध्ये(corona patients in mahad) मोठा स्फोट केला आहे. संपुर्ण महाड तालुक्यात आज २२ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील असल्याचे समजते.

  मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे रूग्ण महाड परिसरात आढळण्यास सुरुवात झाली होती. मात्र एक दोन दिवसाआड एखाद दुसरा रुग्ण आढळून येत असल्याने गतवर्षी प्रमाणे कोणत्याही प्रकारची भिती व दहशत नागरीकांमध्ये दिसून येत नव्हती.

  आजपावेतो सुमारे सत्तावीस रूग्णांवर उपचार सुरू असून यापैकी काही जणांना सोडून देण्यात आले आहे. आज या संदर्भात प्राप्त झालेल्या शासकीय माहितीनुसार एकूण २२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

  महाड तालुक्यात गेल्या महिन्याभरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.महाड नगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे पुन्हा एकवार सूचित केले आहे.

  शहरात व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ती व्यक्ती राहात असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत केले जात नाही मात्र ज्या संख्येने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे ते पहाता महाड शहरात गतवर्षी प्रमाणे सावधानता बाळगून आवश्यकता वाटल्यास शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतील असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

  शासनाने रविवारी रात्रीपासून सुरू केलेल्या संचारबंदीचे दृश्य परिणाम दोन दिवसांत तरी आढळून आले नसून या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाल्याचे आजच्या शहरातील संख्येवरून स्पष्टपणे दिसून येत असून नागरिकांनी वेळीच स्वत वर शासकीय निर्देशाची बंधने घालून न घेतल्यास महाड मध्येदेखील राज्यातील काही महानगरांप्रमाणे लॉकडाऊनची टांगती तलवार सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या शासकीय वृत्तानुसार औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या पुढे आली होती मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांत महाड शहर व लगतच्या गावांमधून कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.