पेण अर्बन बॅंकेतील 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खटला आता ईडी न्यायालयाकडे वर्ग

    रायगड जिल्ह्यातील 75 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेल्या पेण अर्बन बँकेतील 700 कोटी रूपयांच्या घोटाळयाचा अलिबाग न्यायालयात सुरू असलेला खटला आता मुंबईतील ईडी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसे आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ईडीने जप्त केलेल्या बँकेच्या मालमत्ता विक्रीतील मोठा अडसर दूर होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

    सप्टेंबर 2010 मध्ये पेण अर्बन बँकेचा 700 कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आणि रायगड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता अखेर ठेवीदार उपोषणाला बसल्यावर 2011 मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल झाला. पण यातील आरोपींना अटक झाली नव्हती हे प्रकरण उघडकीय आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी मुख्य सूत्रधार बँकेचे माजी अध्यक्ष शिशीर धारकर आणि तज्ज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा याला अटक करण्यात आलं.

    सध्या बॅंकेचे आजीमाजी संचालक व ऑडीटरसह एकूण 43 जण ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने या बँकेच्या अनेक मालमत्ता जप्त करून त्यावर बोजा चढवला होता. त्यामुळे या मालमत्ता विकून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात अडथळा येत होता. बँकेचे लाखो ग्राहक, ठेवीदार आजही आपल्या ठेवी परत मिळतील या आशेवर जगत आहेत. यातील अनेकजण मृत्युमुखी पडले. ठेवीदारांनी यासंदर्भात अनेकदा मोर्चे, आंदोलने केली परंतु त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही.

    अलिबाग न्यायालयातील खटला मुंबईतील ईडी न्यायालयात वर्ग करावा असा अर्ज ईडीने केला होता त्यावर आज सुनावणी होवून न्यायालयाने खटला वर्ग करण्याचा निर्णय दिला. यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर अनेक ठेवीदारांनी समाधान व्यक्त केलं आहे.