diveagar gold ganesh

दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचे मंदिर देखील बांधून तयार आहे. परंतु त्या ठिकाणी मूर्ती का बसवण्यात येत नाही हा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे.

श्रीवर्धन: श्रीवर्धन(shreewardhan) तालुक्यातील दिवेआगर या गावाला अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. दिवेआगर गावात असलेले रूपनारायण मंदिर शिलाहार राजाच्या काळात बांधण्यात आले आहे, असे सांगितले जाते. दिवेआगरमध्ये अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकीच एक मंदिर आहे या ठिकाणच्या गणपतीचे.

diveagar ganesh madir

द्रौपदीबाई पाटील यांच्या वाडीत १७ नोव्हेंबर १९९७ रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवश  नारळ सुपारीच्या झाडांना पाणी घालण्यासाठी खोदकाम चालू असताना तांब्याची पेटी आढळून आली. ही पेटी उघडली असता आतमध्ये एक सुवर्ण गणेशाची मूर्ती व काही हिऱ्याचे दागिने असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही मूर्ती प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. ही सुवर्ण गणेशाची मूर्ती म्हणजे दिवेआगर(diveagar goden ganesh idol) येथे असलेल्या गणपती मंदिरातील पाषाणी गणपती मूर्तीचा सोन्याचा मुखवटा.

सुवर्ण गणेशाची मूर्ती दिवेआगर येथे सापडल्यानंतर याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर पसरली. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडल्यापासुनच. असंख्य भाविक व पर्यटक दररोज सुवर्ण गणेशाची मूर्ती पाहण्यासाठी दिवेआगर येथे येऊ लागले. ती मूर्ती प्रशासनाच्या ताब्यात असेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देण्यात येत होता.

अलिबाग येथील अतिरिक्त पोलीस दलाची एक संपूर्ण गाडीच दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराजवळ दिवस-रात्र बंदोबस्तासाठी उभी असायची. मात्र काही काळानंतर ही मूर्ती प्रशासनाने त्या ठिकाणी असलेल्या देवस्थान न्यासाच्या ताब्यात दिली. त्यानंतरसुद्धा काही दिवस दोन पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असायचे. मात्र नंतर प्रशासनाने देवस्थान न्यासाला कळविले की, जर तुम्हाला बंदोबस्त हवा असेल तर तो शासकीय रक्कम भरून घ्यावा. देवस्थान न्यासाकडे तेवढ्या उत्पन्नाची सोय नसल्यामुळे त्यांनी तो बंदोबस्त न घेता स्थानिक दोन चौकीदार ठेवून त्या ठिकाणी बंदोबस्त निर्माण केला. नंतर २०१२ साली गुढीपाडव्याच्या मध्यरात्रीला फासे पारध्यांनी दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या छपरावरील कौले काढून मंदिरात प्रवेश मिळवला. मंदिरात झोपलेल्या दोन्ही चौकीदारांना जोरदार प्रहार करून जखमी केले व सुवर्ण गणेशाची मूर्ती मंदिरातून घेऊन त्यांनी पोबारा केला.

सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व श्रीवर्धनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड यांनी अत्यंत तत्परतेने केला व आरोपींना अटक केली. आता दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचे मंदिर देखील बांधून तयार आहे. परंतु त्या ठिकाणी मूर्ती का बसवण्यात येत नाही हा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे. मूर्ती ताब्यात मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरीही न्यायालयात प्रकरणाचा निकाल लागल्यामुळे ही मूर्ती शासनाच्या ताब्यात घेण्यास काहीच हरकत नाही असे जाणकारांचे मत आहे. शासनाने ती मूर्ती लवकरात लवकर ताब्यात घेऊन ती पुन्हा व्यवस्थितपणे घडवून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात पुनर्स्थापित करावी, अशी मागणी आता भाविकांमधून होऊ लागली आहे.