पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका

पनवेल : कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे आत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची अर्थात कोरोना योद्धांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या

 पनवेल : कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे आत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची अर्थात कोरोना योद्धांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे.पनवेलमध्ये आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई, नवी मुंबई येथे आत्यावश्यक सेवेसाठी जाणारे लोक आहेत. मुंबई,नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती व आंदोलनाचा इशाराही दिला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुंबई महापालिकेने बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश पारीत केले होते व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तसे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आणि मुंबई महापालिकेचा आदेश कागदावरच राहिला. पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मुंबईमध्ये अत्यावशक सेवा देणारे कर्मचारी तर कोरोना संक्रमित होतच आहेत आणि त्यांच्यामुळे आता त्यांच्या परिवारातील सदस्यदेखील कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढतच चाललेले आहे. याबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तात्पुरत्या स्वरूपात कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे. लवकरात लवकर या जनहित याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाने आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी मान्य केली तर पनवेल परीसर कोरोना संक्रमण मुक्त होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे.