जामीन रद्द न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली आणि झालं उलटंच

तक्रारदाराची आई, भाऊ व मावशीविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आई व मावशीचा घेतलेला अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिने अविनाश पाटील यांच्यासाठी २५ हजार रुपये व स्वतःसाठी १५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

अलिबाग  : अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. गुरुवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

रेखा सचिन मोहिते-साळुंखे (वय ३२, रा. नेरळ पोलीस लाईन, ता. कर्जत) असे अटक केलेल्या महिला कर्मचार्‍याचे नाव असून, ती नेरळ पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय महिला तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदाराची आई, भाऊ व मावशीविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आई व मावशीचा घेतलेला अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिने अविनाश पाटील यांच्यासाठी २५ हजार रुपये व स्वतःसाठी १५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या तक्रारीची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता रेखा मोहिते-साळुंखे हिने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटच्या पथकाने लाच मागणार्‍या महिला पोलीस नाईक रेखा मोहिते-साळुंखे हिला अटक केली आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस हवालदार विचारे, सोडकर, महिला पोलीस नाईक गणपते, महिला पोलीस शिपाई राजपूत यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.