श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा खंडित,वादळाचा पुन्हा एकदा तडाखा

रविवारी मध्यरात्री दीड वाजल्या पासून साडेतीन वाजेपर्यंत श्रीवर्धन तालुक्याला वादळाचा पुन्हा एकदा तडाखा बसला. जरी हे चक्रीवादळ नसले तरी समुद्री वादळ होते. परंतु वाऱ्याचा वेग चांगलाच होता. वादळाच्या काळात ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता.

 श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा खंडित होणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. तासन् तास वीज पुरवठा खंडित होऊन सुद्धा ग्राहकांना मात्र वाढीव बिले पाठवण्यात येतात. रविवारी मध्यरात्री दीड वाजल्या पासून साडेतीन वाजेपर्यंत श्रीवर्धन तालुक्याला वादळाचा पुन्हा एकदा तडाखा बसला. जरी हे चक्रीवादळ नसले तरी समुद्री वादळ होते. परंतु वाऱ्याचा वेग चांगलाच होता. वादळाच्या काळात ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता. पर्यायाने श्रीवर्धन मधील वीजपुरवठा रात्री एक वाजून ३५ मिनिटांनी खंडित झाला. सदरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना सोमवारी दुपारी दीड वाजला. म्हणजेच श्रीवर्धन तालुका पूर्णपणे बारा तास अंधारात होता. ज्यांच्या घरी जनरेटर आहेत त्यांचे ठीक आहे, परंतु इन्व्हर्टर असलेल्यांना ही बॅकअप मिळत नसल्यामुळे त्यांना ही अंधारात लागले.

कारण रविवारी दिवसभर कमीत कमी चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित होत होता. २००९ साली सुनील तटकरे साहेब श्रीवर्धन मधून आमदार म्हणून निवडून गेले व त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी तटकरे यांनी गोंडघर या ठिकाणी मोठे सबस्टेशन मंजूर करून पाभरे येथील मुख्य सब स्टेशन मधून चार उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे काम पूर्ण करून घेतले. याअगोदर दिघी पर्यंत श्रीवर्धन सबस्टेशन येथूनच विद्युत पुरवठा होत असे. परंतु गोंडघर सबस्टेशन झाल्यानंतर बोर्लिपंचतन, दिघी या परिसरातील वीजपुरवठा गोंडघर सबस्टेशन येथून करण्यात आला आहे. परंतु गोंडघर सबस्टेशन ते श्रीवर्धन सबस्टेशन ही जुनी उच्च दाबाची विद्युत वाहिनी अद्यापही अस्तित्वात आहे. ज्यावेळेला गोंडघर सबस्टेशन कार्यान्वित झाले, त्या वेळेला श्रीवर्धन सबस्टेशन येथे म्हसळा पाभरे येथून येणारी इन्कमिंग लाईन नादुरुस्त झाली तर गोंडघर सबस्टेशन वरून वीज पुरवठा श्रीवर्धन सबस्टेशन पर्यंत करण्यात येत असे.

पर्यायाने श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा पाच ते दहा मिनिटात सुरळीत होत असे. परंतु मागील अनेक वर्षांपासून गोंडघर सबस्टेशन ते श्रीवर्धन सबस्टेशन ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी दुरुस्त न केल्यामुळे या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवरून विद्युत पुरवठा घेणे महावितरणच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना अशक्यप्राय झाले आहे. तरी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याप्रश्नी लक्ष घालून गोंडघर सबस्टेशन ते श्रीवर्धन सबस्टेशनच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे काम तातडीने व्यवस्थितपणे पूर्ण करून घ्यावे. जेणेकरून श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर पट्टा वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येपासून मुक्त होईल.