कोकणात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी एस. टी.ची सुविधा द्या – प्रितम म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये मुंबई व ठाण्यामध्ये राहणारे नागरिक मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावाकडे जात आहेत .गावाकडे

पनवेल : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये मुंबई  व ठाण्यामध्ये राहणारे नागरिक मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावाकडे जात आहेत .गावाकडे जात असताना त्यांची शासनामार्फत करण्यात आलेली  व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अनेकजण आपल्या लहान मुलांसोबत पायी चालत जाण्याचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात आता पर्यंत तिघांना प्राण गमवावे लागले आहेत . त्यामुळे गावाकडे जाणार्‍यांसाठी एस.टी ची सुविधा देण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

कोरोना विषाणूने  तीन महिन्यांपासून भारतात प्रवेश केला. हळूहळू तो महाराष्ट्रात दाखल झाला आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन झाल्यानंतर हळूहळू रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांकडील अन्नधान्य, पैसे संपले आणि त्यांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. पनवेलमार्गे पेण, वडखळ, नागोठणे असा प्रवास करत रोज शेकडो नागरिक पायी प्रवास करत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत चालत जाताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

या चालत जाणार्‍या नागरिकांमध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास त्याचा संसर्ग ज्या गावात ती व्यक्ती जाणार आहे त्या विभागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर काही ठोस नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रवास करून आलेल्या नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे  कोकणात जाण्यासाठी पायी चालत निघालेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्स राखत नियमाप्रमाणे जर बसेसची व्यवस्था करण्यात आली तर शासनाकडे त्या प्रकारची प्रवास करणाऱ्या नागरिकांची माहितीसुद्धा राहील. तसेच चार तासांच्या प्रवासाला तीन दिवस पायी चालत जाऊन अपघाताची शक्यताही कमी होईल. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे करून त्याची प्रत उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, परिवहन मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे.