शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे – प्रितम म्हात्रे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

पनवेल : ऑनलाईन शालेय शिक्षण पद्धतीमध्ये शाळांकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्याच्या

पनवेल : ऑनलाईन शालेय शिक्षण पद्धतीमध्ये शाळांकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रितम म्हात्रे यांनी दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संपूर्ण शुल्क जमा करण्याचे ठरविले आहे आणि ते ऑनलाईन वर्ग उपलब्ध करुन देतील. या प्रणाली व कार्यपद्धतीमुळे वीज बिल, मासिक ओव्हरहेड खर्च आणि इतर बचतीसह आवर्ती खर्च कमी होऊन शैक्षणिक संस्थांचा आर्थिक भार कमी होणार आहे. या कोरोना साथीच्या परिस्थितीत राज्यातील पालकांवर फी देण्याचे ओझे आहे आणि कोणत्याही शाळांनी शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलेले माहितीत नाही.  मुंबईतील कोरोनाच्या सद्यस्थितीनुसार काही महिने तरी यापुढे कोणतीही शाळा शालेय वर्ग सुरू करू शकणार नाही आणि राज्यातील पालकांना शालेय फी सक्तीने देण्यास त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर लक्ष देऊन ऑनलाईन शाळा शुल्काबाबत आपले विशिष्ट धोरण ठरवून सर्व राज्यात लागू करावे.  सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्याच्या प्रयत्न करत आहे. यासाठी आघाडीचे सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन काय करावे, आपले वर्ग पुढे कसे घ्यावेत, ऑनलाईन वर्गांसाठी किती शुल्क आकारले जावे यासाठी मार्गदर्शन करावे. पालक वर्ग फी भरण्याच्या विरोधात नाही परंतु आपण या विषयात विचार करून योग्य तो निर्णय घेऊन या कोरोना साथीच्या परिस्थितीत प्रत्येक पालकाला आर्थिक विवंचनेतून बाहेर निघण्यास मदत करावी, अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.