गणपती कारखानदारांचे प्रश्न मार्गी लावणार – खासदार तटकरे

पेण: पेण(pen) हे गणरायाचे माहेरघर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेणमधील गणपती बाप्पाच्या मूर्तींना मागणी आहे. मात्र कोरोना महामारीचे जागतिक संकट तर पी ओ पी बंदी व निसर्ग चक्रीवादळाने कारखानदारांचे कंबरडे मोडले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी काबाडकष्ट करून शेती बरोबरच गणपती व्यवसाय करून आपली उपजीविका करीत आहेत. परंतु या  संकटामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. गणपती कारखानदारांचे प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनात मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे(sunil tatkare) यांनी हमरापूर येथे गणपती कारखानदारांना दिले.

हमरापूर विभाग गणपती कारखानदारांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी हमरापूर येथे भेट दिली. यावेळी कारखानदारांवर आलेले आर्थिक संकट पाहता शासनाने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत असे हमरापुर विभाग गणेश मंडळ अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, श्रीकांत देवधर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसिलदार कांबळे, जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील, अशोक मोकल, संतोष शृंगारपुरे, जगनशेठ म्हात्रे आदींसह गणपती कारखानदार मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार  तटकरे यांनी सांगितले की, व्यवसाय, उद्योग मोठ्या कष्टाने उभा केला जातो.मात्र अशा संकटात होत्याचे नव्हते झाल्याने काय अवस्था होते हे दिसून आले. दोन दिवसात प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. शरद पवार तसेच  सुप्रिया सुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून गणपती कारखानदारांच्या समस्या मार्गी लावणार आहे, असे तटकरे म्हणाले. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाची भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून या व्यवसायावर कारखानदार, मूर्तिकार, रंग, काथा व माती व्यावसायिक, टेम्पो चालक, घरगुती पेंटर अशा उद्योगाची साखळी जोडली आहे. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही, असे आश्वासन खासदार सुनीलजी तटकरे यांनी दिले.