रायगडमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ११ रुग्णांची नोंद, जिल्ह्यात ९२ कोरोनाबाधित

अलिबाग : आज रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ११ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ९२ रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ६

अलिबाग : आज रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ११ रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात अत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ९२ रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ६ तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागात ग्रामीण भागातही वाढू लागला असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग ठिकठिकाणी पसरू लागला आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळले होते, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून, नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच लागू केलेले निर्बंध पाळण्याची गरज आहे.

सर्वत्र कोरोना विषाणू संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिक सरकारने सुचविलेल्या उपाययोजना तसेच निर्बंध पाळत नसल्याचे दिसून येते. आज दिवसभरात जिल्ह्यात ११ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पनवेल महानगरपालिका ७, पनवेल ग्रामीण १, कर्जत २, महाड १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे ९२ रुग्ण सापडले आहेत.
 
३६ जणांनी केली कोरोनावर मात 
रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल २, महाड १, पोलादपूरच्या १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२ रुग्ण आहेत.