पनवेल तालुक्यात कोरोनाचे ४ बळी तर १५ नवीन रुग्णांची नोंद – रायगड जिल्ह्यातली संख्या २०७ वर

पनवेल :पनवेल तालुक्यात आज कोरोनाचे ४ बळी गेले असून १५ नवीन रुग्ण सापडल्याने घबराट पसरली आहे . महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठेत २ आणि खांदा कॉलनीत १ असे ३ बळी तर नवीन ८ रुग्ण सापडले

पनवेल :पनवेल तालुक्यात आज कोरोनाचे ४ बळी गेले असून १५ नवीन रुग्ण सापडल्याने घबराट पसरली आहे . महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठेत २ आणि खांदा कॉलनीत १ असे  ३ बळी तर नवीन ८ रुग्ण सापडले आहेत  पनवेल ग्रामीणमध्ये कोप्रोली येथे एका महिलेचा मृत्यू झाला असून ७ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या १३८ झाली आहे. तालुक्यात कोरोनाचे १८३ रुग्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यात आज उरण आणि अलिबागमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडल्याने  जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०७  झाली आहे

 पनवेल महापालिका क्षेत्रात  कामोठे मध्ये ४ कोरोंनाचे रुग्ण सापडले त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे  खांदा कॉलनीत सापडलेल्या रुग्णाचा ही मृत्यू झाला आहे याशिवाय खारघरमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. कामोठे सेक्टर ३४ मधील मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ महिलांना कोरोनाची लागण झाली . त्यापैकी ५४ वर्षीय महिलेला ब्लड प्रेशर व लिव्हर इन्फेक्शनचा त्रास होता. तिचे निधन झाले. या महिलेची सून ऑल इज वेल क्लिनिक मध्ये काम करीत असून तिच्यापासून तिला संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कामोठे सेक्टर ११ मधील  साई कृपा कॉम्प्लेक्स मधील ७० वर्षीय व्यक्ति ५ मे रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती तिला मधुमेहाचा त्रास होता. खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील श्रीगणेश बिल्डिंग येथील ५२ वर्षीय व्यक्ती अदानी एनर्जी कंपनीत गोवंडीला कार्यरत होती. तिला ४ मे रोजी गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते त्यांचे निधन झाले आहे 

 खारघर सेक्टर ३४ मधील मन्नत बिल्डिंगमधील ३६ वर्षीय व्यक्ति सेबी भवन बिकेसी येथे कार्यरत होती . तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर ३४ मधील सिमरन सफायर सोसायटीतील ३४ वर्षीय व्यक्ती मुंबई एअरपोर्टवर सी.आय.एस.एफ जवान होता. सेक्टर ३ मधील मातोश्री बिल्डिंगमधील ३५ वर्षीय व्यक्ति आपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती . तिला त्याठिकाणी संसर्ग झाला असावा. कामोठे सेक्टर ६ मधील शीतलधारा कॉम्प्लेक्समधील २३ वर्षीय व्यक्तिला तिच्या कुटुंबातील व्यक्तींपासून संसर्ग  झाला आहे.  गुरुवारपर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील १३३३  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी ३६  जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी ९२ जणांवर उपचार सुरू असून ४१  रुग्ण  बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता पर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये शुक्रवारी एका महिलेचा मृत्यू झाला असून ७ नवीन रुग्ण सापडले आहेत. कोप्रोली येथील  महिलेचा रात्री मृत्यू झाला असून शुक्रवारी  उलवे , उसर्ली खुर्द , करंजाडे  आणि कोप्रोली  येथे ७ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ग्रामीण मध्ये  कोरोनाच्या ४५  रुग्णांपैकी ७  बरे झाले आहेत . रायगड जिल्ह्यात आज पनवेल १५, अलिबाग आणि उरण मध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण सापडला आहे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २०७ झाली असून बळींची संख्या ८ झाली आहे.