रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला म्हसळ्यात केराची टोपली – बाजारपेठांच्या ठरवलेल्या वेळेत म्हसळ्यात बदल ?

म्हसळा :शासनाने दिलेल्या लॉकडाऊन ४ मधील नवीन सुचनांनुसार म्हसळा शहरासह सर्व जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये,

 म्हसळा : शासनाने दिलेल्या लॉकडाऊन ४ मधील नवीन सुचनांनुसार म्हसळा शहरासह सर्व जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आधिपत्याखालील क्षेत्रात नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक व नव्याने आदेश दिल्याप्रमाणे दुकाने सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, असे जिल्हाधिकारी रायगड यांचे स्पष्ट आदेश असताना म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी व नंतर बंद ठेवावी असा निर्णय घेण्यात आला. ही बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाली. सध्या देशात चौथा लॉकडाऊन सुरू असून प्रत्येक वेळी लॉकडाऊनचे नियम व रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश नगरपंचायत प्रशासन व  म्हसळा तालुका प्रशासन आपल्याआपल्या परीने घेत असून त्यात बदल करीत असतात. आताही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बाजारपेठांच्या ठरवलेल्या वेळेत म्हसळा नगरपंचायत, तालुका प्रशासन व शहरातील काही मोजकेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशात बदल करून दुकानांच्या वेळा बदलत असल्याने रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला म्हसळ्यात केराची टोपली दाखवली जात असल्याचे बोलले जात आहे. 

या बैठकीला तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी मनोज उर्कीडे, सपोनी धनंजय पोरे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, हिंदू- मुस्लीम समाजाचे अध्यक्ष व विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या वेळी फारुकभाई पेणकर व अन्य ग्राहक प्रतिनिधीनी ग्राहकांच्या खरेदीच्या वेळेत कमी जास्त करू नये अधिक वेळ असल्यास ग्राहकांची विभागणी होऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल या अभ्यासू सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले व बैठकीत मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी असा घातक व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी ठरविलेल्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताच तालुक्यातून तीव्र प्रतिसाद उमटू लागून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे अशा विविध प्रतिक्रिया तालुक्यातून येऊ लागल्या.
याबाबतचा निर्णय उपस्थितांनी घेतला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे तहसीलदार, सपोनी व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमीत शेडगे यांनी संबंधित फोन अगर मेसेजला उत्तर देणे टाळले.
 
म्हसळा उपविभागीय अधिकारी, तालुका प्रशासन,कोव्हीड -१९ या राष्ट्रीय आपत्तीबाबत तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, पत्रकार यांचा योग्य तो समन्वय साधणे आवश्यक असताना अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतात त्याच कारणाने, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे संघटनेच्या माध्यमातून तक्रार करणार आहे. – महादेव पाटील, माजी सभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख म्हसळा