रायगड जिल्ह्याचा पाणी टंचाईवर मात करणारा आराखडा तयार

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत, पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल ते जून या कालावधीसाठी ४ कोटी ४ लाख ६३ हजार रुपये खर्चाचा पाणी टंचाई आराखडा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत, पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल ते जून या कालावधीसाठी ४ कोटी ४ लाख ६३ हजार रुपये खर्चाचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात संभाव्य १ हजार ९ गावे व वाड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 

रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांवर पुरेशी धरणे नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करुन, उपाययोजना करण्यात येतात.  या आराखड्यात टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे यासह खासगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण करण्याच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात येतात. त्यानुसार एप्रिल ते जून या काळावधीसाठी १ हजार ९ गावे व वाड्यांसाठी ४ कोटी ४ लाख ६३ हजार रुपये खर्चाचा पाणी टंचाई आराखडा तयार  करण्यात आला आहे.
१२६ गावे, वाड्यांवर पाणी टंचाई सुरू
रायगड जिल्ह्याला सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी पेण, महाड, पोलादपूर, रोहा या चार तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या तालुक्यांतील २९ गावे व ९७ वड्या अशा १२६ ठिकाणी जिल्हा प्रशासनाने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्याच बरोबर धरणांमधील पाणी पुरवठा खालावल्याने जवळपास २०० हून अधिक गावे व वाड्यांमध्ये पाणी कपात करण्यात आली आहे.
 
पाणी टंचाई कृती आराखड्याची माहिती
उपाययोजना                                     गावे          वाड्या    अपेक्षित खर्च
टँकरने पाणी पुरवठा                           २३०         ६८५     ३ कोटी ३५ लाख ३३ हजार
नवीन विंधन विहिरी                            २१            ५९       ५८ लाख ६४ हजार
विंधन विहिरी दुरुस्ती                            २               ५       २ लाख ५० हजार
नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती             २               १      ६ लाख १२ हजार
खासगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण  ०               ४      २ लाख ४ हजार