अन् आलेली मदत पाहून पाणावले तिचे डोळे….

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील एका मोठ्या सोसायटीतील २ बीएचकेमध्ये राहाणारे कुटुंब . घरात ९ वर्षांच्या छोट्यापासून ९० वर्षाच्या पणजीपर्यंतची सहा माणसे. कर्ता पुरुष नाही. ती

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील एका मोठ्या सोसायटीतील २ बीएचकेमध्ये राहाणारे कुटुंब . घरात ९ वर्षांच्या छोट्यापासून ९० वर्षाच्या पणजीपर्यंतची सहा माणसे. कर्ता पुरुष नाही. ती , तिची दोन लहान मुले, सासू सासरे आणि ९० वर्षांची आजेसासू. ती खाजगी शाळेमध्ये  नोकरी करून घर चालवते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पगार नाही. घरात खायला काहीच नाही . मोठ्या सोसायटीत राहत असल्याने मदत कोण देणार आणि मागायची कशी असा प्रश्न तिच्यापुढे पडलेला. अखेर दोन लहान मुलांची आणि सासू – सासर्‍यांची अवस्था पाहून तिने आपल्या एका सहकारी मैत्रिणीला परिस्थिती सांगून मदत मागितली. मात्र नंतर नगरसेवक अॅड मनोज भुजबळ यांच्याकडून आलेली ती मदत पाहून तिचे डोळे पाणावले. 

तिच्या पतीचे दोन वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. पतीला मुंबईत चांगली नोकरी असल्याने पनवेलमध्ये २ बीएचके ब्लॉक घेतला होता.  दारात दुचाकी आणि चारचाकी गाडी होती. त्याच्या अचानक निधनानंतर नातेवाईकांनी पाठ फिरवली.पतीच्या मित्राने मदतीच्या नावाने गाडी दुरुस्तीला नेऊन तिचा गोवा महामार्गावर मोठा अपघात केला. त्यात गाडी गेली. मित्राने ऑफिसमध्ये आलेले क्रेडिटकार्ड वापरुन लाखो रुपयांचे बिल करून ठेवले. वसुलीला माणसे आल्यावर माहिती समजली. पैसे गेले, गाडी गेली सगळे गेले. पदरी दोन लहान मुले, सासू -सासरे आणि आजे सासू  राहायला फक्त छप्पर उरले. स्वत:चे शिक्षण कमी पण ती डगमगली नाही . एका खाजगी स्कूल मध्ये नोकरी सुरू केली. दोन वर्षे  तुटपुंज्या पगारात अनेक अडचणीला तोंड देत सगळ्यांचा सांभाळ करीत होती. कोरोना सुरू झाला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. दोन महीने पगारही नाही. घरात खायला काही नाही. लहान मुले आणि सासू – सासर्‍यांना काय खायला द्यायचे तिच्यापुढे प्रश्न उभा राहिला. अखेर तिने आपल्या नवी मुंबईत राहणार्‍या सहकारी मैत्रिणीला फोन केला. ती सहकारी मैत्रीणही लॉकडाऊनमुळे  नवी मुंबईत अडकलेली. तिने आपल्या ओळखीच्या पत्रकाराला मदत करायला सांगितले. त्याने  नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांना परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी  कोणतीही चौकशी न करता लगेच तिच्या घरी धान्य आणि इतर सामुग्रीच्या दोन पिशव्या पाठवून दिल्या. ते पाहिल्यावर तिचे डोळे पाणवले. खरंच.. अशी किती तरी कुटुंबे असतील जी  फ्लॅटमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना कसलीच गरज नाही, असे सगळ्यांना वाटत असते. पण तिच्या या उदाहरणावरून तरी त्यातील अनेकांना मदतीची गरज असू शकते याचाही थोडा विचार शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी नक्कीच करायला हवा असल्याचे दिसून येते .