रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील फेरीबोट सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

श्रीवर्धन: राज्य शासनाने ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचे आहे किंवा अडकलेल्या ठिकाणाहून आपल्या गावाकडे जायचे आहे अशांसाठी ई पास सेवा सुरू करून त्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे

 श्रीवर्धन: राज्य शासनाने ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचे आहे किंवा अडकलेल्या ठिकाणाहून आपल्या गावाकडे जायचे आहे अशांसाठी ई पास सेवा सुरू करून त्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश चाकरमानी ई पास काढून आपल्या गावाकडे जाताना पाहायला मिळत आहेत. बहुतेकांनी खाजगी वाहनाद्वारे प्रवास सुरू केलेला आहे. अनेक नागरिक मुंबई येथून स्वतःच्या गाडीने किंवा खाजगी गाडी भाड्याने करून गावाकडे जाण्यासाठी प्रवास करत आहेत. तसेच अनेक व्यापारी शेतीमाल खरेदी करण्यासाठी देखील आपली वाहने घेऊन ई पास काढून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. मात्र रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जंगल जेटी (फेरीबोट) सेवा बंद असल्यामुळे अनेक नागरिकांना किंवा खरेदीदार व्यापाऱ्यांना जास्त किलोमीटरचा प्रवास करून व वेळदेखील वाया घालवावा लागत आहे. तसेच या प्रवास करणाऱ्यांचे इंधनदेखील जास्त प्रमाणात खर्च होत आहे. अलिबागहून श्रीवर्धनकडे येण्यासाठी आगरदांडा ते दिघी अशी जंगल जेटी सेवा उपलब्ध आहे. तसेच श्रीवर्धनकडून दापोलीकडे जाण्यासाठी बागमांडले ते वेश्वी अशी फेरीबोट सेवा उपलब्ध आहे. दापोलीकडून गुहागरकडे जाण्यासाठी दाभोळ ते धोपावे अशी फेरी बोटसेवा उपलब्ध आहे. तर गुहागर वरून जयगड येथे जाण्यासाठी तवसाळ ते जयगड ही फेरीबोट सेवा उपलब्ध आहे. परंतु लॉकडाऊन मुळे सदरच्या फेरीबोट सेवा बंद असल्याने नागरिकांना विनाकारण लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधित जिल्हा प्रशासनाने जंगल जेटी व फेरीबोट सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.