रायगडच्या ३ तरूणांना कमी किमतीत स्वदेशी व्हेंटिलेटर बनविण्यात यश

नितिन देशमुख, पनवेल : जगात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ही

नितिन देशमुख, पनवेल : जगात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना  तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे.  भारतात आणि महाराष्ट्रात ही त्यामुळे  धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून सोलर पॅनल क्लिनिंग रोबो  बनवणाऱ्या आयसनमेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मूळच्या रायगड जिल्ह्यातील तीन तरुण इंजिनीयरनी कमी किमतीत स्वदेशी व्हेंटिलेटर बनविण्यात यश मिळवले आहे.त्यामुळे हिमालयाच्या मदतीला पुन्हा एकदा सह्याद्री धावला असेच म्हणावे लागेल.  

 रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील महेंद्र चव्हाण हे स्वतः एक रोबोटिक वैज्ञानिक असून तसेच ते आयसनमेट चे संस्थापक आणि रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत. त्यांनी सध्याच्या या आणीबाणीच्या काळात स्वस्त आणि दर्जेदार व्हेंटिलेटर बनविण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात कंपनी सुरु ठेवण्याची परवानगी आणि व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव साहेब ठाकरे यांना संपर्क केला आणि  आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या. या व्हेंटिलेटरच्या डेव्हलपमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक्स सोबतच मेकॅनिकल गोष्टीची सुद्धा गरज होती आणि त्या करिता महेंद्र यांनी आपले मेकॅनिकल इंजिनियर असलेले मित्र मयूर गांधी यांना सोबत येण्याची विनंती केली.त्यांच्या श्री इंडस्ट्रीज  कंपनीला  वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा सुमारे सात वर्षाचा अनुभव आहे.  आयसनमेट आणि श्री इंडस्ट्रीजने मिळून हे व्हेंटिलेटर बनवायला सुरुवात केली. महेंद्र चव्हाण, मयूर गांधी व बंधु आकाश चव्हाण या तिघांनी  दिवसरात्र मेहनत करून फक्त आठ दिवसात ऑक्सिमेट हे व्हेंटिलेटर बनवले. आयसनमेट आणि श्री इंडस्ट्रीज यांनी मिळून बनवलेले भारतीय बनावटीच्या व्हेंटिलेटर आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचे असून त्यामुळे  कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होईल.

 ऑक्सीमेट व्हेंटिलेटर हे ऑक्सिजन देण्याचे काम तर करतेच याशिवाय यामध्ये हार्ट बिट्स आणि इसीजीचे निरीक्षण सुद्धा करता येते, विविध आपत्कालीन गोष्टींचा विचार करता हे व्हेंटिलेटर पोर्टेबल पद्धतीने बनवले आहे. हे मशीन व्हेंटिलेटर सोबतच  पेशंट मॉनीटरचे सुद्धा काम करते त्या मुळे एकाच मशीनमध्ये दोन मशीनचे कामे होत असल्याने हे आत्ताच्या परस्थितीत खूप उपयोगी ठरेल,असे महेंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी सुरूवातीला बनवलेल्या व्हेंटिलेटरच्या  मॉडेलचे  नाव हे पूजा-ब्रीदर असून कंपनीने त्याचेच सुधारित दुसरे मॉडेल  ऑक्सिमेट हे बनविले आहे. ऑक्सिमेट हे इलेक्ट्रिसिटी बरोबरच बॅटरीवर सुद्धा हे १३ ते १४ तास सुरू राहते आणि याचा फायदा इलेक्ट्रिसिटी नसतानासुद्धा होऊ शकतो.तसेच हे  व्हेंटिलेटर अत्यंत कमी खर्चात बनवले गेले आहे. भारत सरकारने युद्धपातळीवर व्हेंटिलेटर बनवता यावेत यासाठी आवाहन  केले होते. त्याला प्रतिसाद देऊन आयसनमेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी महाडचे  आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मदतीने संपर्क साधून  व्हेंटिलेटर बनवण्याची परवानगी मिळविली. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत, असे या अभियंत्यांनी यावेळी सांगितले.
 हे व्हेंटिलेटर इलेक्ट्रिसिटी आणि बॅटरीवर सुद्धा चालवता येत असल्याने रुग्णवाहिका, आपत्कालीन दवाखाने व सध्याचे रेल्वेचे वॉर्ड या ठिकाणी सुद्धा वापरता येते. यामध्ये असे आयओटी तंत्रज्ञान वापरले आहे, की जेणेकरून डॉक्टर यांना मोबाईल किंवा रिमोट, कॉम्प्युटर वरून सुद्धा निरीक्षण करू शकतात.
                                                                                                            – मयूर गांधी, मेकॅनिकल इंजिनीयर, श्री इंडस्ट्रीज पुणे.
 या व्हेंटिलेटरमध्ये श्वसनाचा वेग नियंत्रण, ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रण, ईसीजी निरीक्षण, हृदयाचे ठोके निरीक्षण करता येते तसेच हे व्हेंटिलेटर हलके व सहज हाताळणे लायक आहे. – आकाश चव्हाण, आयटी इंजिनीयर, आयसनमेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे.