चक्रीवादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध – योगिता पारधी

म्हसळा :रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने खूप मोठे नुकसान झाले असून नागरिकांची प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वैयक्तिक नागरिकांचे निवारा, फळबागा, पशुहानी, त्याचबरोबर शाळा,

 म्हसळा : रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने खूप मोठे नुकसान झाले असून नागरिकांची प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वैयक्तिक नागरिकांचे निवारा, फळबागा, पशुहानी, त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी अशा सर्वच नुकसान झालेल्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनी शासकीय विश्रामगृह म्हसळा येथील आढावा सभेत सांगितले.

नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या अगोदर कोरोना साथ रोगाशी लढा देत असतानाच आता जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळाने झालेले नुकसान असे दुहेरी संकटावर मात करुन आपली माणसे पुन्हा उभारी घेतील असा विश्वासही योगिता पारधी यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शेकाप जिल्हा चिटणीस आस्वाद पाटिल यांनी संपूर्ण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेताना घरे, छप्पर, आंबा कलमे, काजू, नारळ, सुपारी आणि इतर बागायतीच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनाम्याबद्दल चौकशी केली. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन जिल्हयातील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन या प्रसंगी माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी केले. 
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती निलिमा पाटिल यांनीही आढावा घेताना तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा,अंगणवाड्या, बालवाड्या यांच्या नुकसानीचा आढावा घेताना यामध्ये जिल्हा परिषदेकडूनही जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले.
 निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी म्हसळा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी उपाध्यक्ष तथा शेकाप जिल्हा चिटणीस आस्वाद पाटिल, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा बांधकाम सभापती  निलिमा पाटिल, जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटिल, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे, समाजकल्याण सभापती भोईर, महिला बालकल्याण गीताताई जाधव,जि.प.सदस्य प्रमोद पाटिल, बंटीशेठ पाटिल, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील, जेष्ठ नेते श्रीपत धोकटे, माजी सरपंच तुकाराम महाडिक, सरपंच निलेश मांदाडकर, गण अध्यक्ष सतीश शिगवण, किरण पालांडे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.