श्रीवर्धन तालुक्यात पावसाची संततधार- मोसमी पावसाला सुरुवात, समुद्रदेखील खवळलेला

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही वेळेला पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून मोठ्या सरी देखील कोसळत आहेत. आकाशामध्ये विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू आहे.

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही वेळेला पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून मोठ्या सरी देखील कोसळत आहेत. आकाशामध्ये विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू आहे. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असला तरीही पाऊस किंचितही थांबला की पुन्हा उकडू लागते व अंगातून घामाच्या धारा येतात. समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून लाटा देखील उसळत आहेत. समुद्राच्या पाण्याचा आवाज देखील वाढला असून आता खऱ्या अर्थाने नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. पावसाची सुरुवात चांगली झाली असल्याने आता ज्या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा होत होता त्या गावांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी रोहिणी नक्षत्र निघाल्यावरती धूळ वाफेचा पेरा केला होता. धूळ वाफेचा पेरा म्हणजे शेतातील माती पूर्णपणे कोरडी असताना त्या ठिकाणी नांगर फिरवून भात पेरतात. अनेक शेतकर्‍यांनी निसर्ग चक्रीवादळ होण्याअगोदरच आपल्या शेतामध्ये धूळ वाफेचे पेरे केले होते त्यामुळे वादळाबरोबर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले राब देखील चांगल्या प्रकारे उगवले आहेत. साधारण महिनाभरात भातलावणीच्या कामाला सुरुवात होईल असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. प्लॅस्टिकचे कापड, छत्र्या, रेनकोट इत्यादी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गडबड दिसत होती. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस श्रीवर्धन तालुक्यात झाला होता. या वर्षी देखील सरासरीइतका पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. यावेळेला लॉकडाऊनमुळे मुंबई सोडून गावी आलेल्या शेतकऱ्यांनीदेखील आपल्या शेतामध्ये भात पेरणी केल्याचे पहायला मिळत आहे.