श्रीवर्धन तालुक्यात पावसाची हजेरी, आंबा बागायतदारांचे नुकसान

श्रीवर्धन: गुरुवारी सकाळपासूनच श्रीवर्धन तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते. उष्म्याचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याचप्रमाणे हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे घाम येण्याच्या

श्रीवर्धन: गुरुवारी सकाळपासूनच श्रीवर्धन तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होते. उष्म्याचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याचप्रमाणे हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे घाम येण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली होती. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पाऊस पडेल असे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मात्र पावणे आठ वाजण्याच्या सुमाराला विजा चमकायला सुरुवात झाली व साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे सर्व घरांच्या पागोळ्या गळू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे गटारात देखील पाणी वाहू लागले होते. अवकाळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा आलेला असला तरीसुद्धा आंबा बागायतदारांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण अनेक आंबा बागायतदारांनी आपल्या बागेमधील आंबा उतरवून त्यांचे बॉक्स पॅक करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने अनेकांचे पुठ्ठ्याचे बॉक्सदेखील खराब झालेले आहेत. तसेच आंब्याच्या फळाला पाणी लागल्यामुळे त्याचा भावदेखील कमी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळपासून देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून सूर्याचे किरण कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे आज सायंकाळी पुन्हा पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी आणून ठेवलेली वैरण पूर्णपणे भिजून गेली आहे. अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेला आंबा बागायतदार अवकाळी पावसामुळे आणखीन अडचणीत येण्याची शक्यता आहे. समुद्रातील वातावरण देखील बदलले असल्याचे मच्छीमार बांधवांकडून सांगण्यात येत आहे.