या कंपनीच्या रेमडेसिवीरचा रुग्णांवर दुष्परिणाम, वापर थांबवण्याचे आदेश

हेटरो हेल्थकेअर या कंपनीच्या रेमडेसिवीर औषधामुळे राज्यातील अनेक नागरिकांना त्रास होऊ लागल्याचं दिसून आलंय. या कंपनीच्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा पालघरमध्ये करण्यात आला होता. या ६५० कुप्यांचा वापर करू नका, अशा सूचना हेटरो कंपनीतर्फे जारी करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचना मिळण्यापूर्वीच या कुप्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता काही रुग्णांना त्याचा त्रास होत असल्याचं दिसून आलंय. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण निर्माण झालाय. कोरोनावरील उपचारांसाठी वापरलं जाणारं रेमडेसिवीर या औषधाचा सध्या तुडवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. अनेक सर्वसामान्यांना चढ्या किंमतीत आणि काळ्या बाजारातून हे औषध खरेदी करावं लागत असल्याचेही अनुभव येत आहेत. अशा परिस्थितीत एका कंपनीच्या रेमडेसिवीर औषधामुळे रुग्णांवर विपरित परिणाम होत असल्याचं दिसून आलंय.

    हेटरो हेल्थकेअर या कंपनीच्या रेमडेसिवीर औषधामुळे राज्यातील अनेक नागरिकांना त्रास होऊ लागल्याचं दिसून आलंय. या कंपनीच्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा पालघरमध्ये करण्यात आला होता. या ६५० कुप्यांचा वापर करू नका, अशा सूचना हेटरो कंपनीतर्फे जारी करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचना मिळण्यापूर्वीच या कुप्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता काही रुग्णांना त्याचा त्रास होत असल्याचं दिसून आलंय.

    आदेश मिळण्यापूर्वीच २३२ रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला. त्यापैकी १३ रुग्णांना त्रास होत असल्याचं दिसून आलं. या रुग्णांच्या शरीराला कंप सुटत असल्याचं दिसून आलं. रायगडमध्ये देण्यात आलेल्या ५०० कुप्यांपैकी १२० कुप्या रुग्णांना देण्यात आल्या. त्यापैकी ९० जणांना इंजेक्शननंतर त्रास जाणवल्याचं दिसलं.

    हेटेरो हेल्थ केअर या कंपनीने वितरीत केलेल्या रेमडेसिवीर औषधांचा वापर तत्काळ थांबवण्याचे आदेश रायगड जिल्ह्यात देण्यात आलेत. पुण्यासह इतर जिल्ह्यातला पुरवठाही थांबवण्यात आलाय. या इंजेक्शनच्या वापरामुळे ज्या तक्रारी नोंदवण्यात आल्यात, त्याबाबत अन्न आणि औषध विभागाने कंपनीला स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे.