भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात पण पावसाची हुलकावणी

सुतारवाडी: रोहा तालुक्यातील भात लावणीची काम आता अंतिम टप्प्यात आली असून काही विभागातील भात लावणी पूर्ण झालेली आहे. पावसाने ३० मे ला सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी वर्गाने नांगरणी पेरणी ची काम लवकरच

सुतारवाडी: रोहा तालुक्यातील भात लावणीची काम आता अंतिम टप्प्यात आली असून काही विभागातील भात लावणी पूर्ण झालेली आहे. पावसाने ३० मे ला सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी वर्गाने नांगरणी पेरणी ची काम लवकरच उरकली होती. एक जूनपासून कधी ऊन तर कधी पाऊस असा पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कोरोना अद्याप माघार घेत नाही या विवंचनेत नागरिक असताना आता पावसाचा लपंडाव सुरू असून प्रचंड प्रमाणावर उष्मा जाणवत आहे.  पाऊस पडला तर अगदी एखादी सर येऊन जाते ती सुद्धा एखाद्या ठिकाणी पडते. सर्वत्र पाऊस पडत नाही. जून महिना संपायला तीन दिवस बाकी आहेत. तरीसुद्धा पावसाचे सातत्य नसल्यामुळे बळीराजा चिंतेत दिसत आहे. एकतर बियाणे,  नांगरणी, मजुरी या गोष्टींचा विचार केला तर सामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखे नाही.  उन्हाने हिरवी रोप करपली तर दुबार लावणी कशी करायची,  रोप आणायची कुठून असा ज्वलंत प्रश्न बळीराजालासुद्धा भेडसावत आहे. एक तर सुतारवाडी आणि परिसरातील भात शेती पावसाच्या पाण्यावर घेतली जाते. पाऊस जर सातत्याने नियमितपणे पडला तर पीक बऱ्यापैकी येते. मात्र पावसाने दांडी मारली तर शेतकऱ्याला मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. एकतर सध्या शेती करणे म्हणजे फार खर्चिक गोष्ट आहे. कुटुंबातील परिवाराला पुरेल एवढाच शेतात भात पिकतो. पूर्वीसारखे भात व्यापाऱ्याला विकण्या इतपत पिकत नाही त्यामुळे पाऊस सातत्याने पडने बळीराज्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षात पाऊस समाधानकारक पडला त्यामुळे शेतात पिकही चांगल्या प्रकारे येऊन उत्पादनही चांगले मिळाले होते. त्यामुळे गणपती, दिवाळी,  दसरा हे सण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी गेले. यावर्षी मुंबई तसेच अन्य शहरातील आपल्या कुटुंबातील सदस्य कोरोनामुळे गावाकडे आलेले आहेत. त्याच प्रमाणे ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे अतोनात आर्थिक नुकसान केलेले आहे. पावसाने सातत्य राखणे अत्यावश्यक आहे. तरच बळीराजाची चिंता दूर होईल.